अध्याय 32 - कीर्तनातले तत्त्वज्ञान
परंपरेच्या ठराविक चाकोरीबाहेरचे नव्या विचारांचे तत्त्वज्ञान बहुजनसमाजाच्या गळी उतरवणे फार मोठे कठीण काम. मोठमोठ्या धर्म-पंथ-संस्थापकांनी हात टेकले आहेत. सत्यशोधनाचा नवा वळसा दिसला रे दिसला का बहुजनसमाज सटकलाच लांब दूर. पण डेबूजी गाडगे बाबांची शहामत मोठी! ते आपल्या तत्त्वचिंतनातले सत्यशोधक विचार बेडरपणाने बेधडक लोकांच्यापुढे कीर्तनांतून मांडतात आणि लोकांना ते पत्करावे लागतात. पट्टीच्या शहरी पंडितांना आजवर जे साधले नाही ते गाडगे बाबांनी करून दाखवले आहे आणि महाराष्ट्रभर आपल्या सत्यनिष्ठ अनुयायांची पेरणी केलेली आहे. टाळकुट्या भोळसट वारक-यांपासून तो कट्टर शहरी नास्तिकापर्यंत सगळ्या दर्जाच्या नि थरातल्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी गाडगे बाबा ३-४ तास आपल्या रसाळ कीर्तनाच्या रंगात कसे गुंगवून टाकतात, याचे शब्दचित्र काढणे माझ्या ताकदीबाहेरचे आहे. तो अनुभव ज्याचा त्यानंच स्वतः घेतला पाहिजे. तेव्हा, दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी त्यांच्या कीर्तनातले काही ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद करतो.
(१) देवासाठी आटापिटी
बरं आता, देव म्हणजे काय? हे सांगणं कठीण आहे बाप्पा. शास्त्र पुराणं वेद यांचं हे काम. माझ्यासारख्या अनाडी खेडवळाला कसं बर ते सांगता येणार? पण माझ्या इवल्याशा बुद्धीप्रमाणे सांगतो. पटतं का ते पहा. हे सगळं जग निर्माण करणारी आणि ते यंत्रासारखे सुरळीत ठेवणारी आणि अखेर ते लयालाही नेणारी एखादी महाशक्ती असावी. तिला आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक धर्माने काहीतरी नाव नि रूप दिलेले आहे. नावरूपाशिवाय माणसाची समजूत पडत नाही. बरं आता देव कुठं आहे? संतशिरोमणि तुकोबाराय म्हणतात,
देव आहे तुझ्यापाशी । परि तू जागा चुकलाशी ।।
माझे भक्त गाती जेथे । नारदा मी उभा तिथे ।।
अशी एक कथा आहे की देवाचा महान भक्त नारद याने देवाचा ठावठिकाणा पत्ता विचारला. त्यावर देव सांगतात का मी वैकुंठात नाही, कैलासात नाही, कुठंही नाही. मग पत्ता? तर देव सरळ पत्ता देतात हे नारदा, माझे भक्त माझे गुणगान कीर्तन करीत असतील, तेथे द्वारपाळाची नोकरी करीत मी उभा आहे. मला दुसरीकडं कुठं हुडकण्याची नि पहाण्याची खटपट नको. देवाची जागा आपल्याला मालूम असताना आपण भुरळलो. भलभलत्या फंदाच्या नादी लागून भटकत आहोतत. इस्लाम धर्मात एक पुरावा आहे.
बंदे! तूं क्यूं फिरता है ख्वाबमें, मैं हूं तेरे पास.
आपण हे सारं टाकलं आणि देवासाठी जत्रा यात्रा तीर्थक्षेत्रे धुंडाळू लागलो. यावर संतांचे इषारे काय आहेत पहा.
जत्रामे फत्तर बिठाया । तीरथ बनाया पाणी ।
दुनिया भई दिवाणी । पैसेकी धुळधाणी ।।
काशी गया प्राग त्रिवेणी । तेथे धोंडा पाषाण पाणी ।।
तीर्थवासी गेले आणि दाढीमिशा बोडून आले।।
पाप अंतरातले नाही गेले । दाढी मिशीने काय केले ।।
भुललो रे भुललो. आपण सारे भलतेच करू लागलो. तुकोबाराय म्हणतात.
शेंदून माखोनिया धोंडा । पाया पडती पोरे रांडा ।।
देव दगडाचा केला । गवंडी त्याचा बाप झाला ।।
देव सोन्याचा घडविला । सोनार त्याचा बाप झाला ।।
सोडोनिया ख-या देवा । करी म्हसोबाची सेवा ।।
दगडाला चार दोन आण्याचा शेंदूर फासून बायका मुलं घेऊन त्याच्या पाया पडता, तोंडात राख घालता, ही कायरे बाप्पा तुमची अक्कल? देवमूर्ती घडवणारे पाथरवट आणि सोनार हे तुमच्या देवाचे बाप का होऊ नयेत? चुकला. आपला रस्ता साफ चुकला. आपण खड्ड्याकडं चाललो आहोत. म्हसोबा मरीआईपुढं बचक बचक राख तोंडात टाकणारे धनी कधी हुशार सावध होतील देवच जाणे. आता आपलं सगळंच कसं फसत चाललंय ते पहा.
सवाल – जगात देव किती आहेत?
जबाब – (श्रोत्यांचा) – एक.
सवाल – देव एकच आहे, हे जर खरं तर आता खोटं बोलायचं नाही हो बाप्पा. आपल्या गावी खंडोबा आहे का नाही? (आहे.) मग आता देव किती झालं? (दोन.) आपल्या गावी भैरोबा आहे काय? (आहे.) आता देव किती झालं? (तीन.) आपल्या गावी मराई आहे का नाही? (होय, आहे.) आता देव किती झालं? (चार.)? आपल्या गावी म्हसोबा आहे का नाही? (आहे.) आता देव किती झालं? (पाच) पहिलं म्हणत होता देव एकच आहे म्हणून. मग हा कारखाना कुठं सापडला? आणि याची वाढ कुठवर लांबणार? अशा लोकांना तुकोबा म्हणतात, ``वेडं लागलं जगाला देव म्हणती धोंड्याला’’ मेंढे आहोत आपण. काही ज्ञान नाही.
एका तोंडाने म्हणायचे का देवाने आपणा सगळ्यांना आणि जगाला निर्माण केलं आणि गावोगाव पहावं तर दगडांना शेंदूर फासून हजारो लाखो देव तयार करण्याचा कारखाना आम्ही चालू ठेवलाय. अहो, बाप्पानो, दगड धोंड्यांना नुसता शेंदूर फासून जर त्याचा देव होत असेल आणि तो नवसालाही पावत असेल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून सपाटेबाज शेंदूर फासून त्याचा टप्पोरेबाज भला मोठा देव बनवता येईल आणि तो आपले मोठमोठाले नवस पण फडशा पाडीत जाईल. मग काय? शेती नको, कष्ट मेहनत नको, गुरंढोरं नको, त्या देवापुढं ऊद धुपाचा एक डोंगर धुपाटला का आपोआप शेती पिकून तयार. जमंल का हे असं केलं तर? (नाही, नाही, नाही.) तर मग हा धंदा लबाडीचा आहे.
Comments
Social Counter