All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    37 - अंधू पंगू कुष्ट्यांना मिष्टान्न-भोजने

    अध्याय 37 - अंधू पंगू कुष्ट्यांना मिष्टान्न-भोजने

    आत्यंतिक निरिच्छता हा गाडगे बाबांच्या चारित्र्याचा आत्मा. त्याच्यापुढे मोठमोठ्या धनवंतांनी हात टेकले नि उदारधींच्या उदारतेने मान वाकवली. चिंध्या-मडकेधारी ही त्यागी विभूति कंठशोष करून जनतेला नवा माणुसकीचा धर्म शिकवते, दररोज पाच-पंचवीस मैलांची पायपिटी करीत गावेच्या गावे नि शहरेच्या शहरे पायदळी घालते कोणी काही मिष्टान्न पक्वान्न, कपडालत्ता दिला तर त्याचाही अव्हेर करून निघून जात, अडल्या नाडल्याच्या अडवणुकीत सोडवणुकीला धावते, कसे या साधुपुरुषाचे पांग फेडावे? या प्रश्नाने गावोगावचे लोक विव्हळ व्हायचे. ``बाबा, तुमच्यासाठी आम्ही काय करावे सांगा?’’ ``माझ्यासाठी? मला कशाचीच गरज नाही. काही करायचेच असेल तर तुमच्यासाठी तुम्ही करा, मी सांगतो. अन्नदानासारखा जगात दुसरा मोठा धर्म नाही. तुम्ही भाग्यवंत लोक नेहमी आणि सणासुदीला गोडधोड करून खाता. बाबांनो, जरा सभोवार नजर टाका. शेकडो हजारो लाखो आंधळे, पांगळे, लुळे, लंगडे महारोगी गावोगाव मुंग्याच्या वारुळासारखे वळवळाताहेत. उष्ट्यामाष्ट्यावर कशी तरी पोटाची खाच भरताहेत. तुमच्या कमायतीत नाही काहो बाबांनो, त्यांचा काही हक्क? त्या आपल्या अभागी भावाबहिणींना सन्माने पाचारून वर्षातून एकदा तरी, एकाद्या यात्रेजत्रेच्या प्रसंगी, गोडधोडाचे पोटभर जेवण घालण्याची वहिवाट ठेवाल तर देवाला तोच खरा निवेद. तीच त्याची खरी भक्ति नि ती खरी त्याची महापूजा.’’
    सप्ताहाच्या भंडा-याप्रमाणेच अनेक वेळा केवळ अनाथ अपंगांसाठी मिष्टान्नांची भोजने आणि त्यांना वस्त्रदान, हे समारंभ महाराष्ट्रात हजारो ठिकाणी आजवर साजरे केले आहेत आणि साध्यही होत आहेत.


    झंजावाती संचाराती फलश्रुति

    गाडगे बाबांचा संचार म्हणजे एक तुफानी झंजावाताचा सोसाटा म्हटले तरी चालेल. कोणत्याही ठिकाणी एक दिवसापेक्षा अधिक ते कधी रहायचेच नाहीत. आज मुंबईला दिसले तर उद्या व-हाडात वर्ध्याला, परवा औरंगाबादला नि तेरवा थेट गोव्याच्या सरहद्दीवरील एकाद्या गावी. त्यांची गाठभेट बिनचूक घेणे आजवर त्यांच्या निकटवर्ति अनुयायांनाही साधत नाही, तेथे इतरांचा पाड काय? या झंजावाती संचारात त्यांनी व-हाड ते गोमांतकापर्यंत लोकांच्या रहाणीचे फार सूक्ष्म निरीक्षण केलेले आहे. यात्रा जत्रांच्या तीर्थक्षेत्रांत गोरगरिबांच्या अन्नपाणी, निवा-याचे किती भयंकर हाल होतात, ते त्यांनी पाहिले होते. ही अडचण दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि जागोजाग धर्मशाळा, सदावर्ते, पाणपोया आणि मागासलेल्या जनतेच्या उमलत्या पिढीसाठी शाळा नि बोर्डिंगे स्थापन करण्याची अनन्यसामान्य कामगिरी केलेली आहे.
    सन १९०८ साली ऋणमोचनच्या नदीला घाट, परीट जमातीची धर्मशाळा – गावक-यांच्या इच्छेसाठी लक्ष्मीनारायणाचे मंदिर वगैरे गाडगेबाबांना लोकांकडून करवून घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. त्यानंतर सालोसालच्या वार्षिक मुद्गलेश्वराच्या पौषी यात्रेला बाबा गेले का एकेका नवीन कार्याचा पाय घालीत आणि भटकंतीला जात. ऋणमोचनाला आता एकचसा काय, पण सोयीस्कर जागी नदीला चार प्रचंड घाट बांधण्यात आले आहेत व पांचव्या घाटासाठी जनतेची ५ हजारांची वर्गणी तयार आहे.
    बाबांचे ते फुटक्या गाडग्याचे टवकळ जशी त्यांची कामधेनू, तशी आत्यंतिक निरिच्छतेने आणि कमाल निस्पृहतेने झळकणारी त्यांची वाणी जागोजाग कल्पवृक्षाप्रमाणे मोठमोठ्या धर्मशाळा अन्नसत्रे गोरक्षण संस्था आणि शिक्षणाच्या शाळा जादूप्रमाणे निर्माण करीत चालली आहे. तोंडातून शब्द निघायची थातड, मोठमोठे श्रीमंत स्त्री पुरुष तो झेलायला आजूबाजूला हात जोडून उभेच असतात. गाडगे बाबांनी केवळ इच्छामात्रे करून महाराष्ट्रभर उभारलेल्या असल्या लोकोपयोगी इमारतींचे नि संस्थांचे जाळे फार विशाळ आहे. त्यांची तपशीलवार माहिती आणि देणगीदारांची यादी एका १०० पानी सचित्र ग्रंथातच छापलेली मिळते. वानगीदाखल काही ठळक संस्थांची नावे मात्र येथे देणे शक्य आहे.

    (१)ऋणमोचन घाट. मंदिर. सन १९०८. खर्च रु. २५ हजार. आणखी ३ घाटांचा हिशेब निराळाच.
    (२)   मूर्तिजापूर गोरक्षण संस्था, धर्मशाळा, सन १९०८, खर्च १ लाख रुपये
    (३)   पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा, सन १९२०, खर्च १ लाख
    (४)   पंढरपूर मराठाशाळा, सन १९२०, खर्च २लाख
    (५)   पंढरपूर परीट धर्मशाळा, सन १९२५, खर्च २५ हजार
    (६)    नाशिक धर्मशाळा, सन १९३०, खर्च ३ लाख
    (७)    आळंदी धर्मशाळा, सन १९३०, खर्च १ लाख
    (८)    आळंदी परीट धर्मशाळा, सन १९३०, खर्च ० हजार
    (९)     देहू धर्मशाळा, सन १९३०, खर्च २५ हजार
    (१०)    त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा, सन १९४८, खर्च २५ हजार
    (११)    पुणे आकुल धर्मशाळा, सन १९४०, खर्च दीड लाख
    (१२)    त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा, सन १९४०, खर्च १० हजार


    याशिवाय आणखी पाच पन्नास संस्था आहेत, त्यांची नावनिशीवार यादी कोठवर द्यावी? पंढरपूरची हरिजन धर्मशाळा पुढे चालण्यासाठी नुकतीच डॉ. आंबेडकर यांच्या स्वाधीन करण्यात आली.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES