*कोण होता बळीराजा ?*
दिवाळीच्या
सणातील एक दिवस असतो *बळीप्रतिपदा* आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी वा भाऊबिजेच्या
दिवशी महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामिण भागातील आणि त्यातही बहूजन समाजातील
स्त्रिया आपल्या *नवऱ्यांना किंवा भावांना ओवाळताना “इडा
पिडा टळो आणि बळिचं राज्य येवो!” अशी सदिच्छा का व्य़क्त करीत असतात?*
पुराणात
सांगितल्या प्रमाणे वामनाने पाताळात गाडलेला तो बळी हाच की काय? मग
त्याचे राज्य पुन्हा यावे म्हणून या स्त्रिया आज वर्शानूवर्षे ही साद का घालत आहेत?
असे अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले आणि मी या बळीचा शोध सुरू
केला. प्रसिद्ध विचारवंत आ. ह. साळुंखे यांचे भलेमोठे बळिवंश नावाचे पुस्तक माहीत
होते पण ते तेवढे मोठे पुस्तक वाचून घेणे शक्यही नव्हते. मग शेवटी कालसंगत वागत
इंटरनेटचा आधार घेतला आणि थोडक्यात का असेना पण कोण होता बळीराजा? या प्रश्नाचं जे माणसाच्या सदसद विवेकाला पटणारं तार्कीक उत्तर मला मिळालं
ते आपणासमोर ठेवत आहे.
*बळीराजा* हा प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्गुणी, प्रजाहितदक्ष
व सामर्थ्यशाली असा विख्यात दैत्यराज. सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा निरागस
माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक
रितीने विभागून देणारा संविभागी नेता. भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित
असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर. बळी-
हिरण्यकश्यपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता.
भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व. सुमारे साडे तीन
ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता.
सुमारे तीन-चार हजार वर्षांपुर्वी बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधुसंस्कृतीमधील धान्याची कोठारे भरली होती. बळीराजानेही आपल्या पूर्वजांचे अनुसरण करीत, पण त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने पेरणी सुरू केली. पेरणी धान्याची होती. पेरणी संस्कृतीचीही होती. पेरणी जीवनमुल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती. पेरणी रक्तमांसाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांचीही होती. बळीराजा हा एक कर्तृत्ववान आदर्श राजा होता. ज्यांने आपले राज्य प्रजेच्या हिता-सुखासाठी समर्पित केले होते. आपल्या राज्यातील प्रजेचा विकास आणि संरक्षणांकडे त्यांने अधिक लक्ष दिले. हे करीत असताना त्याने कोणताही वर्ण, जात, धर्म वा पंथ पाहीला नाही. न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही. म्हणूनच बळीराजा हा उदारमतवादी, मोठ्या मनाचा, शुर, पराक्रमी, अनेक गुणसंपन्न, बलवान, मितभाषी, शत्रु आर्य ब्राम्हणांना रणांगणात पाठ न दाखविणारा, योग्य काळाची वाट पहाणारा, सत्य शील, सर्वांविषयी सावध असा महान राजा होता. बळीराजा हा शेतकऱ्यांवरती आर्याद्वारे कुठे अन्याय अत्याचार घडत असतील तर लगेच तो शत्रु आर्यास कठोर शासन करीत असे. बळी राजा हा गोर गरीबांना न्याय, हक्क देणारा होता. बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता. शेतकर्यांना शेती विषयक सर्व ज्ञान असल्यामुळेच त्यांची शेती सम्रुद्ध होती. प्रजा सुखी,समाधानी व कर्तबगार होती. कुठलाच अधर्म नव्हता. शोषण विरहीत समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट्य होते. स्त्री-पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असत. अत्यंत सुरेख आणि सम्रुद्ध अशी नगरे सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी वसवली होती. दस्युची स्वतःची सम्रुद्ध नगरे होती याचा अर्थ त्यांचे जीवन अत्यंत सम्रुद्ध आणि संपन्न व विकसित होते.
बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हटले जात असे. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा म्हणजेच जिल्ह्याचा प्रमुख जोतिबा आणि मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होते. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते.
अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच खैबर खिंडीतून घोडे दामटत आलेल्या आक्रमक आर्यांच्या वामन परशुराम या सेनापतींनी बळीच्या देशाला लुबाडले. आर्य वामन हा आपल्या टोळ्या घेवून बळीराज्याच्या प्रदेशात घुसला आणि त्याने लुटमार सुरू केली. बळीला छलकपट करून बंदी बनविले. त्याची शस्त्रे, संपत्ती व राजसत्ता हिरावून घेण्यात आली. बाहेरून आलेल्या आर्यानी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकावले. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन(विष्णूचा अवतार?) याने बळीराजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही भाकडकथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला कपटाने मारण्यात आले. वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. अशावेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, “आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.” दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दुःखी व कष्टी प्रजेला भेटायला येतो अशी समजूत आहे. बळी पाताळात गेला, याचा अर्थ त्याने केरळात राज्य स्थापन केले असावे, असे अभ्यासकांचे मत आढळते. पं. सातवळेकरांच्या मते त्याने कोकणात राज्य स्थापन केले असावे. कन्याकुमारीच्या दक्षिणेला समुद्रात गेलेल्या एका भूशिरावर त्याची राजधानी होती, असे उल्लेख तमिळ वाङ्मयात आढळतात. त्रिविक्रम वामनाने बळीला पाताळात ढकलले, या विषयावरची अनेक शिल्पे दक्षिणेत आढळतात.
वामनाने बळीला पाताळात गाडले या पुराणातील भाकड कथेची महात्मा जोतिबा फुले यांनी परखड चिकित्सा केली आहे. फुले समग्र वाङमयात प्रसिद्ध असलेल्या यासंबंधीच्या त्यांच्या लेखात ते म्हणतात, वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात होता. प्रुथ्वी व आकाशातील अंतर करोडो मैल आहे. माणसाचा एक पाय जमिनीवर असल्यास तीन फ़ुट अंतरावर जाता येत नाही कारण त्याच्या पायाची लांबी व दोन पायातील अंतर मर्यादित असते. वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात असता तर वामनाची …. फ़ाटून गेली नसती काय ? वामनाच्या या 3 पावलांचा तार्कीक परामर्श डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपल्या बळीवंश या पुस्तकात घेतला आहे. ते म्हणतात, वामनाने पहिल्या पावलाने विशिष्ट भुप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले व दुसरे पाऊल वेदप्रामाण्य होते. लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता. तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तिला कुंठित करून टाकणारे होते. म्हणजेच वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल आणि इतरांना लिहिणे, वाचणे , बोलणे या बाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला. तात्पर्य, यज्ञाने भुमी व्यापणे, वेदप्रामाण्याने लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे. महात्मा फुले यांनी दस्युचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला आहे त्याच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी “बळी राज्यादी कुळस्वामिला” या शब्दांनी केली आहे. येथे “राज्यादी” हा शब्द “राजादी” या अर्थाने आला आहे. जोतिबा बळीराजाला कुलस्वामी मानतात याचा अर्थ ते त्याला आपला अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे ते एक प्रकारे बळीराजाबरोबरचे आपले नातेच सांगून टाकतात. कुळस्वामिकडे हल्ली देवता म्हणून पाहिले जात असले, तरी कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष हाच त्याचा खराखुरा अर्थ आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. स्वतःला विवेकी, बुद्धीजीवी म्हणवणाऱ्या आणि आपल्या उज्वल ऐतिहासीक परंपरांचा अभीमान बाळगणाऱ्या आपण सर्वांनी पोथ्या-पुराणांतून समोर आलेला इतिहास पडताळून घेतला पाहिजे आणि आपले खरे शूर, पराक्रमी, परोपकारी पूर्वज कोण? आपले खरे आदर्श (देव) कोण? याचा अभ्यासपूर्ण शोध घेतला पाहीजे. हा शोध आपल्या रुढी व परंपरांच्या तर्कशुद्ध चिकित्सेतून घेतला पाहिजे. त्यासाठी त्यावरील अंधश्रद्धांची पुटे खरवडून काढली तर अस्सल इतिहास आपल्याला सापडल्याशिवाय राहाणार नाही. आपल्या डोक्यातून अंधश्रद्धा नष्ट व्हायच्या असतील तर आपल्या देवांचा अभ्यास करून त्यामागील क्रांतीकारक इतिहास शोधून काढला पाहिजे. प्राचीन काळापासूनच्या सर्व रुढी, परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची आज नितांत गरज आहे. त्याशिवाय जातीयवाद्यांनी लादलेल्या रुढी, परंपरा व दगडाचे देव आणि आपले खरेखरे ऐतिहासिक देव यातील फरक कळणार नाही.
दिवाळीतील बळीप्रतिपदेच्या दिवशी गावी आजी बळीराजा आणि त्यांच्या मंत्र्यांची जी पुजा बांधायची त्यामागचा इतिहास हा असा आहे. असाच इतिहास खंडोबा, जोतीबा, भैरोबा, म्हसोबा अशा सर्वच देव-देवतांचा असणार. पोथ्या-पुराणांच्या वा टीवी मालिकांच्या पारायणांतून तो आपल्याला सापडणार नाही तर विवेकी, चिकित्सक इतिहास संशोधकांच्या, विचारवंतांच्या आणि त्याहीपुढे आपल्या स्वतःच्या सदसद विवेकबुद्धी व तर्कबुद्धीने हा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याच देव-देवतांविषयी मनात आलेले प्रश् न स्पष्टपणे, निरभीडपणे विचारून त्य़ांची तर्कशुद्ध उत्तरे शोधावी लागतील. यासंदर्भात आपणाला प्रेरक ठरेल असे महात्मा फुलेंनी बळीराजासंदर्भात त्यांच्या मनात आलेल्या प्रश्नाचे रचलेले हे कवन आपणापुढे ठेवतो.
बळीराजा
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर,होते रणधीर मरुत्यास. धृ.बळीस्थानी आले शूर भैरोबाखंडोबा,जोतिबा, महासुभा. १.सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी,दशहरा,दिवाळी आठविती. २.क्षत्रिय भार्या “इडा पीडा जाओबळी राज्य येवो ” अशा का बा? ३.आर्य भट आले,सुवर्ण लुटिले,क्षत्री दास केले बापमत्ता. ४.वामन का घाली बळी रसातळी?प्रश्न जोतीमाळी करी भटा. ५.
*संदर्भ:*
मराठी विश्वकोष-
*आ. ह. साळुंखे*,
*बळीवंश-आ. ह. साळुंखे,*
इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो- निलेश रजनी भास्कर कळसकर-प्रबोधन डॉट कॉम,)
*समतावादी संस्कृतीचा महानायक बळीराजा-* प्रा. श्रावण देवरे-लोकसत्ता.
मराठी विश्वकोष-
*आ. ह. साळुंखे*,
*बळीवंश-आ. ह. साळुंखे,*
इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो- निलेश रजनी भास्कर कळसकर-प्रबोधन डॉट कॉम,)
*समतावादी संस्कृतीचा महानायक बळीराजा-* प्रा. श्रावण देवरे-लोकसत्ता.
Comments
Social Counter