अध्याय 39 - सत्यशोधक समाजाच्या ध्येय-उद्दिष्टांची अंमलबजावणी
सत्यशोधक समाजाच्या चळवळीला बाल्यावस्थेतच नख लावण्याच्या उद्देशाने ब्राह्मणांनी सत्यशोधक समाजाविरुध्द प्रचार करण्यास प्रारंभ केला.
''ब्राह्मणांनी घाबरवून सोडलेले हे गरीब व अज्ञानी लोक ज्योतिरावांकडे येऊन त्यांना विचारीत, 'अहो मराठीत केलेली प्रार्थना देवाला कशी ऐकू जाईल?' ज्योतिरावा त्यांना समजावून सांगत की, 'मराठी, गुजराती, तेलगू किंवा बंगाली भाषेत परमेश्वराची प्रार्थना केली तर ती परमेश्वराला पोहोचत नाही किंवा रूजू होत नाही, असे मानणे ही चुकीची गोष्ट आहे. विधाता हरएक मनुष्याचे मन जाणतो. त्याची आंतरिक इच्छा, प्रार्थना त्याला कळतात. लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतून केलेल्या प्रार्थना देवाला ऐकू गेल्या नाहीत काय? तुकाराम, नामदेव, चोखामेळा, सावता माळी यांच्या प्रार्थना देवाच्या कानी गेल्या नाहीत काय?''49
सत्यशोधक समाजाचे कोणी सभासद होऊ नये असा प्रचार ब्राह्मण लोक खेडयापाडयात करीत आणि त्याबरोबर धाकही दाखवीत. सत्यशोधक समाजाचे जे सभासद होत त्यांचा छळ केला जाई. सरकारी नोकरीत ब्राह्मण अधिकाऱ्याच्या हाताखाली सत्यशोधक समाजाचे सभासद असलेल्या व्यक्ती नोकरीत असल्या तर त्यांना छळ सोसावा लागे. केव्हा केव्हा त्यांना नोकरीसही मुकावे लागे.
''नारायणराव कडलक हे सरकारी नोकरीत असून सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते. त्यांची बदली हेतुत: पुण्याहून महाबळेश्वरला करण्यात आली. जर ब्राह्मणांच्या उपस्थितीशिवाय कोणताही धार्मिक विधी केला किंवा संस्कार केले तर तसे संस्कार करणाऱ्या कुटुंबावर परमेश्वराचा कोप होईल किंवा ब्राह्मण आणि देव यांच्या शापामुळे त्यांचे नि:संतान होईल, अशी त्यांना ब्राह्मण भीती दाखवीत असत.''50
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याच्या ध्येय-उद्दिष्टांच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. 1848-73 या काळात फुले यांनी या उद्दिष्टांच्या संदर्भात बरेच कार्य केले होते. 1873 नंतर त्या कार्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले.
''सत्यशोधक समाजाचा लढा हा मुख्यत: धर्मसंस्थेशी व विशेषत: भिक्षुकशाहीशी होता. नामधारी ब्राह्मण धर्मविधी करताना जे मंत्र व मंगलाष्टके म्हणत त्यांचा अर्थ आमच्या लोकास समजत नाही, म्हणून सत्यशोधक समाजाकडून विवाह व इतर कार्यासंबंधीचे धर्मविधीची पुस्तिका लोकहितार्थ मराठीत तयार केली व त्या पुस्तिकेच्या प्रथम आवृत्तीच्या 2000 प्रती छापल्या होत्या.''51
फुले यांनी सत्यशोधक विवाहपध्दती या नावाची एक अभिनव सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन करणारी क्रांतिकारी पध्दत अमलात आणली. स्वत: ज्योतिरावांनी ब्राह्मणांच्या गैरहजेरीत सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्ने लावली.
''ज्योतिरावांचा एक दूरचा नातलग त्यांच्या दुकानात नोकर होता. त्याने सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्न करण्यास होकार दिला. ब्राह्मणांनी मुलीच्या बापाला विरोधात उठविले; परंतु त्या मुलीची आई सावित्रीबाई फुले यांची मैत्रीण असल्यामुळे ती या निर्धारापासून ढळली नाही. हा नियोजित विवाह 25 डिसेंबर 1873 साली झाला. पानसुपारीचा जो काही खर्च आला तेवढाच. वधू-वरांनी एकमेकांशी निष्ठेने वागण्याविषयीच्या फुलेरचित शपथा सर्वांच्या देखत घेतल्या. सत्यशोधक समाजाचे सभासद बहुसंख्येने या विवाहसमारंभास हजर होते. लग्न समारंभ सुरक्षितपणे पार पडला.''52
ब्राह्मण भिक्षुकांशिवाय हिंदू विवाह! खरोखरच ही एक मोठी आश्चर्यकारक घटना घडली. ब्राह्मणांच्या दृष्टीने ज्योतिरावांकडून घडलेला हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे माफ करण्यात आला; परंतु सत्यशोधक विवाह पध्दतीने दुसरा विवाह ज्योतिरावांनी करण्याचे ठरविताच त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे ब्राह्मण भिक्षुकांनी ठरविले.
''ज्ञानोबा ससाने या विधुराचा विवाह ब्राह्मण व स्वकीयांचा कट्टर विरोध असतानाही फुले यांनी स्वत:च्या घरी 7 मे 1874 रोजी लावला.''53
''1884 मध्ये ओतूर गावच्या गावच्या माळी, साळी, तेली जातीच्या लोकांनी सत्यशोधक विवाह पध्दतीने लग्ने लावली. या विवाह पध्दतीत वधूच्या गावी वर आल्यास गावातील महाराणीने हातात दीपताट घेऊन ओवाळावे, अशी योजना होती. तत्कालीन वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेला ते एक आव्हानच होते. लग्नविधीत मंगलाष्टके म्हणण्याचे काम स्वत: वधूवराने करावे. लग्नविधीनंतर सर्व मानव बंधूतील पोरक्या मुला-मुलीस व अंध पंगूस दानधर्म करावा. श्रीमंत लोकांनी शिक्षण फंडास मदत करावी, असे या विवाहाचे स्वरूप होते. लग्नविधी, वास्तुशांती व दशपिंडविधी या तिन्ही विधीत फुले यांनी ब्राह्मणांचे अस्तित्व नाकारले होते. सत्यशोधक विवाह हा साधा व अल्प खर्चातील होता. फुले यांच्या अनेक अनुयायांची लग्ने या पध्दतीनुसार झाली.''54
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपूर्वीच फुले यांनी स्त्रिया व अस्पृश्यांच्या शिक्षणाचे मोठे काम हाती घेतले होते. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याला आणखी गती मिळाली.
''सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवून घेतले व दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.''55
पुण्यातील सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे लोन पोहोचविण्यास सुरुवात केली.
''पुण्याजवळ हडपसरजवळ एक शाळा काढली. हडपसर हे सत्यशोधक समाजाचे एक मोठे केंद्र बनले. शूद्र लोकांस विद्येची अभिरुची नसल्याने त्यांच्या मुलांना दररोज शाळेत येण्याची सवय लागावी म्हणून सत्यशोधक समाजाच्या वतीने एक पट्टेवाला ठेवला होता.''56
सत्यशोधक समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वत्तृफ्त्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
''1875 च्या काळात सत्यशोधक समाजाने एक निबंध स्पर्धा जाहीर केली. त्यासाठी दोन बक्षिसे ठेवण्यात आली. 'हिंदी शेतकीची सुधारणा कशी करता येईल' हा निबंधाचा विषय होता.''57
''1876 सालच्या मे महिन्यात एक खास वत्तृफ्त्व स्पर्धा ठेवण्यात आली. त्यासाठी दोन विषय ठेवण्यात आले. 'मूर्तीपूजा उपयुक्त आहे किंवा कसे?' आणि दुसरा विषय 'जातीभेद आवश्यक आहे किंवा कसे?' यशस्वी उमेदवारांना बक्षिसे देण्यात आली.''58
ज्योतिराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने व उपकरणे वापरावी, म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत.
''स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, अशी प्रार्थना केली होती. त्या अर्जाचा हेतू सफल झाला.''59
''कनिष्ठ वर्गातील पाच टक्के विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, असे शिक्षण खात्याचे संचालक येरफिल्ड यांनी सरकारी शाळांना जे आज्ञापत्रक काढले होते, त्याविषयी त्यांचे आभार मानले. सत्यशोधक समाजाच्या कार्याविषयी आपुलकी दाखवून त्या कार्याला प्रसिध्दी देणाऱ्या 'सत्यदिपिका, 'सुबोधपत्रिका' आणि 'ज्ञानप्रकाश'ला धन्यवाद देण्यात आले. सत्यशोधक समाजाने चालविलेल्या शिक्षणकार्याच्या प्रचारासाठी हरि रावजी चिपळूणकर यांनी जे मोठे साहाय्य केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.''60
सत्यशोधक समाजाने या काळात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहकार्य केल्याचे दिसून येते.
''सप्टेबर 1875 मध्ये अहमदाबादेत जो प्रचंड जलप्रलय झाला होता तेव्हा पुण्या-मुंबईतील सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी रुपये 325- दिल्याचा उल्लेख समाजाच्या तिसऱ्या वार्षिक अधिवेशनात आहे.''61
शूदातिशूद्रात विद्येचा प्रसार व्हावा यासाठी वसतिगृह काढण्याचा विचार सत्यशोधक समाजाने प्रारंभीच केला होता. या विचाराला फुले यांचे जवळचे स्नेही कृष्णराव भालेकर यांनी मूर्त स्वरूप दिले.
''भालेकरांनी 18 नोव्हेंबर 1884 रोजी पुण्यात कसबा पेठेत सुशिक्षणगृह स्थापन केले. लहान-मोठया खेडयातील पाटील, देशमुख, इनामदार आणि नोकरीच्या निमित्ताने सतत बाहेर असणारे लोक आपल्या मुलाची पुरेपूर काळजी घेऊन त्यांना विद्यार्जनास प्रोत्साहित करू शकत नाहीत, हे लक्षात घेऊन हे गृह स्थापन केले. तेथे प्रामुख्याने कुणबी, मराठा, माळी अशा जातीची दहा वर्षांखालील मुले दरमहा रु. बारा घेऊन ठेवली जात. या सुशिक्षणगृहातील मुलांची व्यवस्था पाहण्याच्या कामी डॉ. विश्राम घोले व गंगाराम भाऊ म्हस्के यांनी मदत केली.''62
सत्यशोधक समाजाच्या समकालीन असलेल्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज इत्यादींचे कार्य शहरापुरते व उच्चवर्णीयांपुरते मर्यादित होते. त्यांची भाषा, आचार हे सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळया पातळीवरचे होते. सत्यशोधक समाज हा बहुजन, शूद्रातिशूद्र लोकांशी निगडित असला तरी इतर जातीधर्माचे लोकही यात सामील होते.
''ब्राह्मण, महार, मांग, ज्यू आणि मुसलमान या जातीधर्माचे लोक या समाजाचे प्रारंभीच्या काळात सभासद होते. सत्यशोधक समाजाच्या वतीने अनेक सहभोजनाचे कार्यक्रम पार पाडले जात. सत्यशोधक समाजाच्या शाखा अनेक ठिकाणी स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांच्या सभा आठवडयातून एकदा होत असत.''63
सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता कसा होता, याविषयी कुलकर्णी म्हणतात,
''साधासुधा, प्रामाणिक, शेतकरी, कामगार हा सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता होता, सभासद होता. त्याचे तत्त्वज्ञान साधेच होते. त्याचे ध्येयही साधे, सरळच होते. हृदयातील प्रेरणा ही त्याची कार्यशक्ती होती. त्याची भाषा ही त्याची रोजचीच होती. साधी सोपी सर्वांना समजणारी! आणि त्याची प्रार्थना ती अन् त्याचा देव यांना कोणतीही जागा चालत होती. त्यांच्या सभा, बैठका आणि प्रचार यांना कोणतीही जागा चाले. अगदी एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतातील मळणीची जागाही त्यासाठी चालत होती.''64
''सत्यशोधक समाजाच्या प्रचारकांचा पोशाखदेखील सर्वसामान्य कनिष्ठ वर्गातील माणसासारखाच असे. कमरेला धोतर नेसलेले, खांद्यावर एक घोंगडी घेतलेली अन् डोक्याला पागोटे गुंडाळलेले असे. ते प्रचारक हाती डफ घेऊन प्रचाराला जात. त्यांची प्रचारातील भाषणे म्हणजे शिष्टसंमत सभेतील भाषणासारखी आखीव, रेखीव, विद्वत्तादर्शक, गहन, जड अशी अजिबात नसत तर ते जणू आपल्या श्रोत्यांशी गप्पाच मारत असत.!''65
ज्योतिरावांना कार्याच्या तळमळीने प्रभावित झालेले अने कार्यकर्ते मिळाले. त्या कार्यामुळे या समाजाच्या ध्येय-उद्दिष्टांचा फैलाव सर्वत्र झाला.
''मुंबईत व्यंकू बाळोजी काळेवार, जाया कराळी लिंगू, व्यंकय्या अय्यावारू; पुण्यातील धनाढय गृहस्थ रामशेठ बप्पूशेठ उरवणे, डॉ. अण्णासाहेब नवले, मारुतराव नवले, डॉ. विश्राम घोले, पुढे बडोद्याचे दिवाण झालेले रामचंद्रराव धामणकर, कामगार चळवळीचे जनक नारायण मेधाजी लोखंडे, डॉ. संतूजी लाड, ज्योतिरावांचे स्नेही सदाशिवराव गोवंडे आणि सखाराम परांजपे हे सत्यशोधक समाजाचे आरंभीचे सदस्य होते. तुकाराम तात्या पडवळ व विनायकराव भांडारकर हे समाजाचे सभासद नि वर्गणीदार होते. गणपतराव सखाराम पाटील, बंडोबा मल्हारराव तरवडे, वासुदेवराव लिंगोजी बिर्जे, डॉ. सदोबा गावंडे, देवराव कृष्णाजी ठोसर, विठ्ठलराव हिरवे, लक्ष्मणराव घोरपडे, सीताराम रघुनाथ तारकंडू, हरिश्चंद्र नाराययण नवलकर, रामजी संतूजी आवटे, सरदार बहादूर दर्याजीराव थोरात, धोंडीराम रोडे, पं. धोंडीराम नामदेव कुंभार, गणपतराव मल्हार बोकड, भाऊ कोंडाजी पाटील - डुंबरे, गोविंदराव काळे, भीमराव महामुनी, माधवराव धारवळ, दाजीसाहेब यादव पाटील पौळ, सयाजीराव मेराळ कदम, राजकोळी, धनश्याम भाऊ भोसले व भाऊ पाटील शेलार हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते होते.''66
1874 साली सत्यशोधक समाजाचा पहिला वार्षिक समारंभ मोठया थाटाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.
''वार्षिक सभेमध्ये कार्यकारी मंडळामध्ये थोडा फेरफार करण्यात आला. नारायण तुकाराम नगरकर यांची कार्यवाह म्हणून निवड झाली तर भालेकर आणि रामशेठ उरवणे यांची कार्यकारी मंडळावर निवड झाली.''67
1875 साली सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ साजरा करण्यात आला.
''ज्योतिरावांनी समाजाच्या अध्यक्षपदी धुरा समाजाचे एक प्रभावी तरुण नेते डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या खांद्यावर दिली. कोषाध्यक्षपद रामशेठ उरवणे यांना दिले. त्या वर्षी इलैया सालोमन नावाच्या एका ज्यूला कार्यकारी मंडळाचा सभासद करून घेतले.''68
सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक अहवालात हा समाज कसा सक्रिय होता, ध्येय-उद्दिष्टांची अंमलबजावणी कशी होत होती, याचे दाखले मिळतात.
''गोविंद भिलारे पाटील या सातारा जिल्ह्यातील व्यक्तीने ब्राह्मणाच्या मदतीवाचून दोन वर्षात 11 लग्ने लावली होती. ग्यानू झगडे यांने ब्राह्मणाशिवाय एक पुनर्विवाह घडवून आणला. गणपत आल्हाट याने आपल्या आजीचे पिंडदान ब्राह्मणाशिवाय केले. नारायणराव नगरकरांच्या वडील बंधुंनी आपल्या भावजयीचे उत्तरकार्य ब्राह्मणाशिवाय केले.''69
''व्यंकू काळभोर यांनी अंश्र, अपंग लोकांना वस्त्रे दिल्याचा व हरी चिपळूणकरांनी घनश्याम किराड या गरीब विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिल्याचा उल्लेख आहे.''70
सत्यशोधक समाजाची प्रारंभीची तीन वर्षाची वाटचाल खूपच सक्रिय होती. प्रत्येक सत्यशोधक झपाटल्यासारखे कार्य करीत होता. सर्वच कार्यकर्त्यांना फुले यांनी एका ध्येयवादाच्या प्रवाहात खेचून आणले. फुले यांचे नेतृत्व सर्वांनीच मान्य केले होते. आरंभीच्या काळात सत्यशोधक समाजाच्या बैठका नियमित होत. देणगी व खर्चाचे हिशेब व वर्षभराच्या कार्याचे अहवाल सादर केले जात व पुढे या कामात सातत्य राहिले नाही. याबद्दल भालेकर आपली नाराजी व्यक्त करतात,
''सत्यशोधक समाज म्हणून ज्योतिराव फुले यांनी पुण्यास एक पंथ काढला होता. त्यातही शिरून मी काही वर्ष राहून पाहिले; परंतु सुतार, लोहार, सोनार, कासार इ. पांचाळ हिंदू लोकांप्रमाणे सत्यशोधकांनी फक्त ब्राह्मणास बाजूस सारून हिंदू रिवाज म्हणजेच मूर्तीपूजा, जातीभेद वगैरे सर्व प्रकारच्या घातक रूढी जशास तशा चालविल्या आहेत. दुसरे असे की, सत्यशोधकास कोठेच मुख्य स्थळे नाहीत. समाजात अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस वगैरे सर्वानुमते निवडलेले नाही. वार्षिक रिपोर्ट कधी प्रसिध्द होत नाही. फंडाचे हिशोब नाही वगैरे तेथून सर्व गोंधळ.''
3.2 सत्यशोधक समाजाची मूलभूत तत्त्वे
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याच्या शाखा अनेक ठिकाणी काढण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी दर आठवडयास सभा होत असत. पुण्यातील सोमवार पेठेतील डॉ. गावंडे यांच्या घरी दर आठवडयाला सभा भरत असे. अशा सभेत सत्यशोधक समाजाच्या खालील तत्त्वांवर चर्चा होऊन कार्याची आखणी केली जात असे.
''सर्व मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे करावे, दारूबंदीचा प्रसार व्हावा, स्वदेशी वस्तू वापरण्यास प्रोत्साहन द्यावे, धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणांनी पौरोहित्य करण्याची मिरासदारी झुगारून द्यावी, लग्ने कमीत कमी खर्चात करण्याची व्यवस्था करावी, लोकांमध्ये असलेली ज्योतिष, भूतेखेते, समंध इ. ची भीती नाहीशी करावी, अशा विषयासंबंधीच्या चर्चा त्यामध्ये होत असत. जातीभेद, मूर्तीपूजा यांच्याविरुध्द मुख्य प्रचार असे. परमेश्वराचे जनकत्व आणि मनुष्याचे बंधुत्व या तत्त्वांवर भर दिलेला असे.''72
''सत्यशोधक समाज देव एकच आहे, असे मानीत असे. त्याचे मत मूर्तीपूजा करू नये, असे होते. केवळ दर आठवडयास भरणाऱ्या सभेच्या बहुदा शेवटी सांघिक प्रार्थना होई. धार्मिक बाबतीत मध्यस्थ, पुरोहित किंवा गुरुची आवश्यकता नाही. त्यांच्या आधाराविना किंवा मध्यस्थीविना कोणत्याही व्यक्तीला देवाची प्रार्थना आणि धार्मिक विधी करता येतात, अशी सत्यशोधक समाजाची शिकवण होती. त्यांचे मूळ आधारभूत तत्त्व ब्रह्मा किंवा मोक्ष नसून 'सत्य' हे होते. वेद हे ईश्वरनिर्मित ग्रंथ नसून मानवनिर्मितच आहेत, अशी ज्योतिबांची ठाम धारणा होती. त्याचप्रमाणे बायबल किंवा कुराण यासारखे धर्मग्रंथसुध्दा वेदांप्रमाणेच ईश्वरनिर्मित नाहीत असे ज्योतिबा मानत आणि तसे लोकांना समजावून सांगत.''73
सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचारक कसा होता, याविषयी कीर लिहितात,
''सत्यशोधक समाजाला फार मोठया बुध्दिवाद्यांचा पाठिंबा होता असे नाही. त्याचा तत्त्वज्ञानी पुरुष हा साधा प्रामाणिक शेतकरी होता. तो सामान्य शेतकरी असला तरी त्याला आंगीक प्रेरणा आणि बुध्दिप्रामाण्याची देणगी निसर्गत:च लाभली होती. सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या प्रेरणेचे स्थान हृदय होते. त्याची भाषा जनतेची होती. त्याच्या प्रचाराची स्थळे, सभा बैठका व शेतावरील मळणीचे स्थान. सत्यशोधक प्रचारकांचा पोशाख म्हणजे एक घोंगडी, पागोटे व धोतर आणि हातात एक डफ. आपल्या भाषणात ते शेतकऱ्यांच्या कर्जाचा उल्लेख करीत. धर्मविधी व संस्कार यांच्या जाचाखाली शेतकऱ्यांचे कसे नुकसान होते व जो काही त्यांच्या गाठी पैसा असतो तो धूर्त ब्राह्मण भिक्षुक कसा लुबाडतो याकडे ते शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे लक्ष वेधीत असत. आपल्या मुलाला त्यांनी शिक्षण दिले पाहिजे, असे ते सांगत. तसे केले म्हणजे त्यांना चांगले काय नि वाईट काय, कायदा, धर्म व देव म्हणजे काय हे समजेल, असा त्यांना उपदेश करीत. सत्यशोधक समाजाचे हे प्रचारक शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे त्यांच्या कार्यात आणि प्रचारात पांडित्य व बुध्दिमत्ता यांचे तेज दिसून येत नसे, तथापि त्यांची कार्यशक्ती आणि तळमळ ही फार मोठी होती.''74
3.2.1 तत्त्वाच्या प्रचार व प्रसारार्थ फुले यांच्या सहकाऱ्यांचे कार्य
म. फुले यांच्या काळात त्यांना प्रामाणिक सहकारी लाभल्यामुळे सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वांचा प्रचार व प्रसार झपाटयाने झाला. सुरुवातीच्या काळातील त्यांच्या काही सहकाऱ्यांचे कार्य सत्यशोधक तत्त्वांच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे.
3.2.1.1 कृष्णराव भालेकर (1850-1910)
भालेकरांचा जन्म 1850 साली पुण्यात भांबुर्डे (शिवाजीनगर) येथे झाला. त्यांचे आजोबा राणोजी गावात प्रतिष्ठित मानले जात. राणोजीच्या धाकटया भावाची मुलगी म्हणजे सावित्रीबाई फुले होय. कृष्णरावाचे वडील जिल्हा सत्र न्यायालयात कारकून होते. भालेकरांच्या वडीलांच्या मृत्यूच्या वेळी फुले यांनी 'सत्पुरुषाचा आत्मा' या विषयावर प्रभावी भाषण दिले होते. 1864-68 या काळात भालेकर पुण्याच्या रविवार पेठेतील मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. 1868 ला त्यांनी गरीबीमुळे शिक्षण सोडून दिले. मुंबईचे गुत्तेदार दादाभाई दुवाझा यांचे खेड जि. पुणे येथील कामावर देखरेख करण्याची नोकरी करताना धर्मभोळा, अज्ञानी व दरिद्री समाज त्यांनी जवळून पाहिला. ही परिस्थिती ज्या कारणांमुळे निर्माण झाली, त्यांचाही त्यांनी अभ्यास केला. शेतकरी, शेतमजूर यांच्या सभा घेऊन सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान ते लोकांना समजावून सांगू लागले. धर्मातील अनिष्ट व खोटया रूढींची ते माहिती देत; पण आपल्या कार्यास तेथे मर्यादा आहे, हे ओळखून त्यांनी राजीनामा दिला व ते भांबुडर्यास परत आले.
''फुले - भालेकर यांची भेट मुठेच्या काठी रोकडोबांच्या मंदिरात मे 1872 ला झाली. या मंदिरात भालेकरांनी 'अज्ञानराव भोळे देशमुख' व 'श्रीसत्यनारायण पुराणिक' हे दोन उपहासगर्भ वग सादर केले होते. अज्ञानराव भोळे देशमुख या वगात जहागीरदार, इनामदार, देशमुख असे वैभवयुक्त लोक अज्ञानात असल्यामुळे त्यांच्या हाताखालचे कारभारी त्यांना कसे लुटतात, फसवितात, हे दाखविले. श्री सत्यनारायण पुराणिक या वगातील वेंधळया ब्राह्मणाचे काम मोरेश्वर कावडे हे करीत.''75
सत्यशोधक जलशाचे मूळ या भालेकरांच्या वगात सापडते. आज हे वग उपलब्ध नाहीत; परंतु सामाजिक प्रश्नावरील पथनाटयाचे उद्गाते म्हणून भालेकरांचा उल्लेख करावाच लागेल. हे वग सादर केल्याची बातमी समजल्यामुळे पुफ्ले भालेकरांना भेटावयास आले. फुले यांच्यापेक्षा भालेकरांची भूमिका वास्तववादी होती.
''निराश्रित हिंदू हे आपले देशबांधव व धर्मबांधव आहेत, असे समजून त्यांना ब्राह्मणांनी ज्ञान द्यावे, असा आग्रह धरतात.''76
''अज्ञानी व निराश्रित हिंदू शहाणे झाले तर ते भटाभिक्षुकास देव मानणार नाहीत, सावकार व व्यापारी यांच्याकडून फसविले जाणार नाहीत, सरकारच्या दुराचारी नोकरांना घाबरणार नाहीत.''77
भालेकरांचे विचार फुले यांच्या विचारांशी अनुकूल होते. शिक्षणाने परिवर्तन होईल, अशी त्यांना खात्री होती. आपला ब्राह्मणांवर राग का आहे, याची कारणे ते खालीलप्रमाणे देतात.
1) मानवी हक्क ब्राह्मणांनी अन्य हिंदूस कळू दिले नाहीत.
2)ब्राह्मणांनी इतरांकडून स्वत:ची पूजा करून घेऊन सर्वशक्तीमान परमेश्वराचा अपमान केला.
3) इतर लोकांना ब्राह्मणांनी धर्मग्रंथ वाचू दिले नाहीत.
4)परमेश्वराची आराधना ज्या पवित्र देवालयात होते तेथे सर्व हिंदूंना ब्राह्मणांनी प्रवेश दिला नाही.
5) ब्राह्मणांनी आपले धर्मशास्त्र व कायदे इतर हिंदूंवर लादले.
6) श्राध्दाच्या निमित्ताने त्यांनी मृतात्म्यांचा उपमर्द केला.''78
भालेकरांचा रोष जसा ब्राह्मणांवर आहे तसाच संस्थानिकांवरही आहे. ते म्हणतात,
''संस्थानिक क्षत्रिय हे निराश्रित हिंदूंच्या चळवळींना हातभार न लावता ब्राह्मणांच्या कलेने चालतात. संस्थानिकांच्या खजिन्यातील पैसा हा फक्त त्यांचे नातेवाईक, जातभाई, ब्राह्मण, नायकिणी व तमासगीर यांनाच उपभोगण्यास मिळतो.''79
भालेकरांनी माळी शिक्षण परिषद घेऊन फुले यांच्या कार्याची री ओढली.
''31 ऑक्टोबर 1909 रोजी भालेकरांचे 'माळी शिक्षण परिषदेची आवश्यकता' या विषयावर मुंबईत व्याख्यान झाले. दुसरे व्याख्यान पुणे शहरात झाले. प्रस्तुत परिषद पुणे किंवा मुंबई येथे भरवावी म्हणून लोकांना त्यांनी विनंती केली. नगर येथे जाऊनही हाच प्रश्न लोकांसमोर ठेवला. त्यांच्या या प्रयत्नामुळे 2 जानेवारी 1910 ला पुणे येथे पहिली माळी शिक्षण परिषद भरली.''80
भालेकरांनी आपल्या कृतीयुक्त उपक्रमांनी चळवळीवर एक वेगळा प्रभाव पाडलेला दिसतो. ते स्वत: एक वेगळी चूल मांडीत होते; परंतु कार्याचा सार मात्र एकच होता.
''भालेकरांनी मे 1884 मध्ये दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केली. याकामी त्यांना विठ्ठलराव वंडेकर, रघुनाथ तारकुंडे, हरी चिपळूणकर, हरिश्चंद्र नवलकर, घोरपडे बंधू यांनी सहकार्य केले. लोकांच्या अडचणी सरकारपुढे मांडल्या. सरकारला कायदे करण्यापूर्वी जनतेची खरी स्थिती व मते याबाबत निवेदन सादर करणे, ब्राह्मणेत्तरांतील वाईट चालीरिती बंद करणे यासाठी या सभेची स्थापना करण्यात आली. शिक्षण हे सक्तीचे मोफत असावे, असा आग्रह या सभेने सतत चार वर्षे धरला. त्यासाठी भालेकरांनी एक लक्ष लोकांच्या सह्यांचा अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठविला. त्यांनी भांबुडर्यास 10,000 लोकांची सभा घेऊन दोन ठराव पास केले.''81
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे व काँग्रेस ही सर्व जातीच्या लोकांची सभा नाही, मूठभर उच्चवर्णीयांतल्या शिकलेल्या लोकांची ती सभा आहे. तिच्या मागण्याला आमची संमती नाही, ही भूमिका भालेकरांनी घेतली होती. भालेकर हे सत्यशोधक चळवळीतील निर्भीड कार्यकर्ते होते.
''1885 च्या गुढीपाडव्याच्या दिवशी भालेकरांनी सत्यशोधक समाजाच्या झेंडयाची मिरवणूक पुण्यातील प्रमुख रस्त्यावरून काढली. या मिरवणुकीत मुंबईचे रामय्या अय्यावारू, रामचंद्र हेजीब, पुण्यातील डॉ. भांडारकर, न्या. रानडे, सदोबा गावंडे, एल. के. घोरपडे, एच. एल. नवलकर इ. मंडळी सामील झाली होती. मिरवणुकीत फुले, रानडे, अय्यावारू यांची भाषणे झाली.''82
''1885 ला दयानंद सरस्वती पुण्यात आले असता सनातनी ब्राह्मणांनी त्यांची मिरवणूक उधळून लावली. स्वामी दयानंदांची मिरवणूक उधळून लावल्यानंतर भालेकरांनी त्यांना भांबुडर्यास नेले व त्यांचा सत्कार करून तेथील धर्मशाळेत त्यांचे भाषण घडवून आणले.''83
कृष्णराव भालेकर व म. फुले यांच्या विचारात साम्य होते.
''भालेकरांनी भिक्षुकशाही व ब्राह्मणी ग्रंथ इत्यादींवर टीका करून शूद्रांच्या स्थितीचे वर्णन केले आहे.''84
''सावकारशाही, भटशाही व कुलकर्णी वतन यावर हल्ला करून शेतकरी व कारागीर हेच देशाचे आधारस्तंभ आहेत, असे त्यांनी म्हटले.''85
''कष्टकरी, शूद्र व शेतकरी यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ व भटजी, सावकार, कुलकर्णी यांच्याविषयीची चीड त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते.''86
भालेकरांनी कंत्राट घेण्याच्या निमित्ताने वऱ्हाड व मध्यप्रांतात जाऊन सत्यशोधक चळवळ त्या भागात रुजविली.
Comments
Social Counter