All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    21 - विक्षिप्तपणाचे काही नमुने

     अध्याय 21 - विक्षिप्तपणाचे काही नमुने

    (१)कोणी जेवत बसले असता एकदम जवळ जाऊन भाकरी मागायची. चतकोर तुकडा देऊ केला का याने अर्धी भाकर मागायची. बरं अर्धी घे म्हटले तर सगळी द्या मागायची. तीही पुढे केली का सगळ्या भाक-या मागायच्या. तुला सगळ्या दिल्यावर आम्ही रे काय करायचे? तुम्ही उपाशी रहा, मला फार भूक लागली आहे. अशा जबाबाने प्रकरण शिव्यागाळी हुसकावणीवर यायचे. तसे ते आले का स्वारी निमूटपणे पुढे चालू लागायची.


    (२)एकाद्या गाडीच्या मागेमागे चालायचे. दोनतीन मैल हा कोण चिंध्याधारी गाडीमागे चालतोय, याची गाडीवानाला शंका येऊन तो विचारायचा. मला गाडीत बसू द्या. कुठं जायचं आहे तुला? तुम्ही जाता त्याच गावाला. बरं बस गाडीत. तुम्ही खाली ुतरा मग बसतो मी, बैलांना दोघांचे ओझे होईल. अखेर काय? शिव्या निंदा नि टवाळी. तेवढी पूजा घेतली का स्वारीने पायांचा मोर्चा वळवलाच दुसरीकडे.

    (३)दोन प्रहरी एखादी बाी शेतावर नव-यासाठी भाकरीचे गाठोडे नेत असताना, स्वारीने तिला हाक मारून थांबवावे आणि भाकरी मागावी. माय, भूक लागलीय, दे ते भाकरीचं गठोडं मला. औतक-याला मग कायरे देऊ? राहील तो उपाशी, मला काय त्याचे? उस्तळून ती बाई कडकडून शिव्या देऊ लागली का स्वारी निघून जायची.

    (४)एखाद्या शहरात हमाल लोक दिवसाच्या मजुरीच्या पैशांची वाटणी करीत बसलेले पाहिले का स्वारी जवळ जायची. भिकारी समजून ते एखादा पैसा देऊ लागायचे, पैसा नको, मला रुपाया हवा. रुपाया? तुझ्या बापाने ठेवलाय, चल हो चालता इथून, प्रकरण धक्काबुक्कीवर आले का पोबारा करायचा.

    (५)मोळी विकणारे भेटले का त्यांच्याजवळ लाकडे मागायची. तुला रे लाकडे काय करायची? सैपाक करीन सैपाक करीन बाप्पा. सैपाक? कशावर करणार? धोतरावर करीन. सगळे हसायचे. खांदाडावर डोकं दिसतं पण ते मडकं रे मडकं! धुडकावणी झाली का स्वारीला समाधान.

    (६)तीनप्रहरी एखाद्या घराशी जावे नि भाकरी मागावी. भाकरी शिल्लक नाही म्हटले तर शेवया द्या, मला शेवया फार आवडतात. तुझ्या बापाने ठेवल्यात म्हटले तर दूध द्या गाडगेभर अशी मागणी करायची. दूध नाही तर दोन शेर गूळ दे माय. खाऊन पाणी पिईन. घरवाला बाहेर यायचा नि स्वारीला दण्डा दाखवून हुसकावून द्यायचा.

    (७)गावच्या विहिरीवर हात पाय सोडून बसायचे. मालक दिसला का त्याला विचारायचे ``काय हो, महारांची विहीर कोणती?’’ डेबूजीला महार समजून तो आईमाईवरून शिव्या देऊ लागायचा. ``पण मालक, मी नुसता बसलो आहे, पाणी नाही प्यालो अजून, आता पितो.’’ मालकाने दगडधोंडे मारून स्वारीला हुसकवायचे.

    (८)एकदा एका देवळात पुराण चालले होते. खेडूतांची गर्दी. वेदान्ताचा एक मुद्दा पुराणिकबुवा मोठ्या अवसानाने श्रोत्यांना ओरडून ओरडून सांगत होते. सारेजण मोक्षाच्या विमानात बसल्यासारखे देहभान विसरून रंगले होते. एकदम डेबूजी आरोळी मारतो ``भाकर द्याहो मायबाप. लइ भूक लागलिया पाया पडतो. बापहो, भाकर द्या.’’ या आरोळीमुळे पुराणात एकदम खंड पडला आणि मोक्षाच्या आध्यात्मिक विमानात तरंगत असलेले सारे श्रोते धाडकन बसल्याजागी जमिनीवर असल्याच्या भानावर आले. पुराणिकबुवा संतापले.
    पुरा. – काय रे ए गाढवा, मनुष्य आहेस का कोण आहेस?
    डेबूजी – मी कोण ते आपण सांगितलंच.
    पुरा. – पुराण चाललंय दिसत नाही तुला?
    डेबूजी – पुराण चाललंय, दिसतंय मला मायबाप. पण भाकरी मागायला भिकारी आला तर पुराण चालताना ती त्याला देऊ नये, असं कोणत्या पुराणात लिवलंय दादा.
    पुरा. – फार शहाणा दिसतोय लेकाचा. पुराणाच्या जागी भीक आणतात का कुणी? चल चालता हो. नाही तर...
    डेबूजी –इथं नसलं तर आणवून द्या कुठूनतरी. फार भूक लागलिया बाप्पा.
    पुरा. –  पुराण बंद करून तुला भाकर आणून द्यायला, कोण असा तू मोठा साधू लागलास? कोण आहेस तू? महार का मांग?
    डेबूजी -  मी माणूस आहे महाराज.
    पुरा. – ते कळतंय आम्हाला. जात कोणती तुझी?
    डेबूजी – जात? माणसाची.
    पुरा. – हे विचित्र सोंग कशाला घेतलंस?
    डेबूजी – साधू होण्यासाठी मायबाप.
    पुरा. – अरे अकलेच्या कांद्या, हलक्या जातीचे लोक कधी साधू झालेत का आजवर? त्यांना देव तरी कसा भेटणार?
    डेबूजी – बरं तर. साधू होण्याचा फंद देतो टाकून. पण मला फार भूक लागलीय. भाकर द्या. लवकर द्या. जीव कासावीस झाला.
    ``द्यारे हुसकावून द्या या गाढवाला. नसती पीडा शिंची.’’ असे पुराणिकबुवा कमाण्डरच्या अवसानात लोकांना ओरडून सांगत आहेत आणि लोक मात्र जागच्या जागी बसून एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पहात आहेत, असा देखावा तयार होतो.

    पुरा. –  (चिडून) खूप धंदा शोधू काढलाय गाढवानं. तरणा बांड असून भिक्षा मागतोस. लाज वाटायला पाहिजे तुला.
    डेबूजी – लाज असती तर भिक्षा कशाला मागितली असती महाराज.
    पुरा. – पहा पहा कसा चुरचूर एखाद्या पंडितासारखा बोलतोय तो. आजकाल ताळतंत्रच राहिले नाही. जातीचा हा हलका आणि म्हणे साधू होऊ इच्छितो. साधू व्हायला आमच्यासारख्या श्रेष्ठ जातीतले सारे लोक मेले का काय? म्हणून या चिंध्या मडके-धा-यावर ती पाळी आली. सज्जनहो, पहा, ऐका, खालच्या वर्गातले लोक अशी आपली पायरी  विसरून वरिष्ठांची पायमल्ली करू लागल्यामुळेच पाऊसपाणी गेले, शेती बुडाली आणि हे असले भिकार दिवस आले.

    इतके वादळ उठले तरी डेबूजी शांत मुद्रेने जागच्या जागी उभाच. ओरडून ओरडून पुराणिकबुवांचा घसा खरचटला. ते किंचित थांबले का दिलीच त्याने पुन्हा जोराची आरोळी भाकर वाढा हो मायबापांनो. अखेर मंडळीतून कोणीतरी उठले आणि त्याला बगोटे धरून लांब दूर नेऊन घालवला.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES