अध्याय 17 - वनवासातही लोकसेवा
पाय नेतील तिकडे जायचे. हव्या त्या घरी भाकर मागायची. मिळेल तर कायची. नाहीतर पुढे जायचे. असल्या क्रमात जागोजाग कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला पण होऊन मदत करायला धावायचे. हा एक धर्म डेबूजी कसोशीने पाळीत असे. सामानाने लादलेला खटारा चिखलात रुतून पडलेला दिसला का डेबूजी तेथे धावत जाऊन तो बाहेर काढायला गाडीवानाला मदत करायचा. त्याने कोण, कुठचा, काय पाहिजे विचारले तर नुसते हसावे, दोन हातांनी त्याला नमस्कार करावा आणि मुकाटतोंडी आल्या वाटेला लागावे. हा खाक्या. आश्चर्याने तो गाडीवान पहातच रहायचा. देवच माझ्या धावण्याला पावला अशा समजुतीने तोही गाडी हाकीत निघून जायचा.
व-हाडचा सूर्य माध्यान्हीला माथ्यावर कडाडला आहे. पाय पोळताहेत. एकादी मजूर बाई पाठीला पोर बांधून डोईवर लाकडाचा किंवा कडब्याचा मानमोड्या बोजा घेऊन चाललेली दिसली का डेबूजी तिच्याजवळ जायचा. दोन हात जोडून म्हणायचा : ``माय माझी. दे तुझं ओझं माझ्या डोक्यावर. चल मी तुझ्या मुकामावर नेऊन पोचवतो.’’
विचित्र वेषाचा हा असामी पाहून ती बाई प्रथम भेदरायची. पण डेबूजी ओझ्याला हात घालायचा, स्वतःच्या डोक्यावर घेऊन घेऊन चालू लागायचा आणि तिला मुकामावर पोचवून, एक शब्द न बोलता आपल्या वाटेने निघून जायचा. ती बाई आचंब्यात पहातच रहायची. आजूबाजूचे गावकरीसुद्धा म्हणायचे, ``कोण असावा हा माणूस? आपल्या झिंगरीचे ओझे मैलभर वाहून आणतो आणि भाकरी तुकडाही न मागता खुशाल आपल्या वाटेने जातो ? कुणी देवमाणूस किंवा साधू असावा हा!’’
खेडेगावातल्या सार्वजनिक विहिरी म्हणजे घाणीची आगरे. आजूबाजूला घाण पाण्याचे ओघळ वहायचे आणि ढोरे तेच पाणी प्यायची. डेबूजीने हे पाहिले म्हणजे तो कळवळायचा. ``मला पोहरा दोरी द्या हो मायबाप. मी पाणी काढून ढोरांना पाजतो.’’ अशी त्याने विनंती करून पोहरा दोरा मिळवावा आणि विहिरीतून स्वच्छ पाणी काढून त्याने सगळ्या ढोरांना पाजावे. विहिरीभवतालची घाणेरडी जागा फावडे घेऊन स्वच्छ करावी. पोहरा, दोरा, फावडे ज्याच्या त्याच्या घरी पावते करावे आणि आपण पोटभर पाणी पिऊन पार दूर निघून जावे. लोक आचंब्यात पडायचे. हा कोण चिंध्याबुवा आला, त्याने जागा स्वच्छ करून ढोरांना पाणी काय पाजले नि मुकाट्याने निघूनही गेला. कोण असावा हा?
ज्वारी-कापणीचा हंगाम चालू. स्वारी अशा शेतांजवळून चालली असताना थांबायची. मालकाजवळ `एक पाचुंदा द्या हो बाप्पा’ म्हणायची. ``तुझ्या बापाने ठेवलाय पाचुंदा.’’ मालक गुरगुरायचा. (पाचुंदा म्हणजे पाच पेंढ्या) `बरं तर दोन पाचुंदे द्या.’ मालक रागवायचा. चल चालता हो म्हणून धमकावयाचा. कैक वेळा मारायला अंगावरही धावायचा. जसे कोठे काही झालेच नाही अशा चर्येने डेबूजी तेथेच बसून रहायचा. मजूर कापणीत गुंगलेले. काम जोरात चालू. एकादी बाई किंवा बुवा घामाघूम थकलेली पाहून, डेबूजी त्याच्याजवळ विळा मागायचा. खुषीने दिला तर ठीक, नाहीतर घ्यायचा हिसकावून. ``माजी माय, जरा विसावा घे. मी करतो तुझं काम. रागावतेस कशाला?’’ असे म्हणून खसाखस कापणी करीत सुटायचा. इतर मजुरांच्या पुढे जाऊन त्यांच्यापेक्षा थोड्या वेळात दुप्पट तिप्पट कापणी करताना पाहून मजूर नि मालक डेबूजीकडे पहातच रहायचे. सारे मजूर दुपारच्या जेवणासाठी थांबले तरी याच्या कापणीचा सपाटा तडाखेबंद चालूच. या उप-या प्रवाशी पाहुण्याने भलताच हात चालवून सगळ्यांपेक्षा कापणीत तो पार पुढे गेलेला पहाताच मजूर नि मालक त्याला भाकरी खायला बोलावीत. ठरवलेले काम रेटले का डेबूजी ज्याचा विळा त्याला परत देऊन, मिटल्या तोंडी पार निघून जायचा. सारेजण त्या विचित्र माणसाच्या विलक्षण करणीचे कौतुक करीत त्याच्या वाटेकडे पहातच रहायचे. इथे आला काय, झपाटेबंद कापणी केली काय आणि भाकर देत असता ती नाकारून निघून गेला काय! हा काय कुणी साधू असावा का देवच असावा? एकाद्याने पाच पेंढ्या दिल्याच तर त्या घ्यायच्या आणि वाटेत कुठे थकले भागलेले किंना उपाशी पडलेले ढोर आढळले तर त्याला एक पेंढी खायला घालायची, त्याला गोंजारायचे नि पुढे जायचे. ज्वारी वहाण्याचे काम कुठे चालू असले का डेबूजीने असेच आपण मजुरात घुसून पेंढ्या गोळा करण्याचे आणि गाडीवर त्या बांधण्याचे काम करीत सुटावे. कोठे औत चालू असतील तर तेथे जावे आणि तास दोन तास स्वतः औत चालवून, घाम पुशीत पुशीत शेतक-याला नमस्कार करून निघून जावे. कोण कुठला प्रश्नाला जबाबच द्यायचा नाही. काम करावयाचे नि पसार व्हायचे. मनात आले तर दिली भाकर खायची, नाहीतर देत असतानाही पाठ फिरवून वाट धरायची. जागोजाग हे प्रकार होत असल्याच्या वार्ता खेड्यापाड्यांतून पसल्या आणि पुण्यावानाच्या शेतात देव येऊन कापणी मळणी करतो. असल्या भुमका सगळीकडे ऐकू येऊ लागल्या. ज्यांना अनुभव आले होते. त्यांनी तिखटमीठ लावून त्या कथा सांगितल्यामुळे तर त्या विचित्र देवाच्या येण्याजाण्यावर लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागले.
अचाट निर्भयतेची कमावणी.
एकदा स्वारी अशीच आपल्या तंद्रीत रंगलेली वाटचाल करीत असता एकदम मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, तुफानी वा-याचा सोसाटा चालू झाला. रात्रीची वेळ. जिकडे पहावे तिकडे गुडुप अंधार. इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. वाटेत गुडघा गुडघा पाणी वाहू लागले. ओढे नाले खळखळू लागले. नदीचाही प्रवाह नि वेग वाढला, पुढे पाऊल टाकायची सोय नाही. कुठे जायचे आता? फिरस्ता डेबूजी तसाच बिनदिक्कत चालत होता. अखेर वारा नि पाऊस यांच्या झुंबडीत टिकाव लागणार नाही, अशा समजुतीने नदीकाठच्या एका जुनाट निंबाच्या झाडाखाली निवा-यासाठी थांबला. कसचे काय नि कसचे काय! वा-याचा जो एक तडाक्याचा झोत आला, त्यासरशी ते प्रचंड झाड कडाडले आणि मुळासकट धाडदिशी जमिनीवर कोसळले. डेबूजी चटकन बाजूला सरला म्हणऊन ठीक झाले. ज्याचा आसरा घ्यायला तो गेला, तोच कोसळून जमीनदोस्त झाला. आता पुढे काय? कडाडणा-या विजांच्या प्रकाशात तसाच मार्ग काढीत काढीत तो एका टेकडीवर गेला. वारा नि पाऊस यांची झुंज चालूच होती. मध्यरात्रीच्या सुमाराला ते तुफान थंडावले. डेबूजी नखशिखांत चिंब भिजला. टेकडीवरच्या एका मोठ्या धोंड्यावर बसून त्याने सारी रात्र जागून काढली. अंगावरच्या भिजलेल्या चिंध्या अंगावरच वाळल्या. पहाट होताच स्वारीचे पाऊल पायपिटीसाठी लागले चालायला. बारा वर्षांच्या साधनावस्थेत गाडगे बाबांनी असले शेकडो प्रसंग अनुभवलेले आहेत. थंडी, वारा, पाऊस, कडाक्याचे ऊन्ह, तुफान वावटळी, रानातल्या वणव्यांची आग, एकूणेक प्रसंगांत त्यांनी देहाची आसक्ती कसोटीच्या सहाणेवर घासून बोथट पाडली. मनाची शांती अचल राखली. काम त्यांनी जाळलाच होता. पण क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मदादि विकारांचेही त्यांचे दमनकार्य अखंड चालूच होते. इतकेच काय पण नेहमीच अरण्यात वसतीचे प्रसंग असल्यामुळे, सर्प, विंचू, इंगळ्या, वाघ, कोल्ही, लांडगे या क्रूर श्वापदांचेही भय त्यांनी गिळून टाकले होते. निर्जन रानावनात मन मानेल तेथे तो गाढ झोपी जाई. आसपास जंगली श्वापदे येवोत जावोत ओरडोत वेढा देऊन बसोत, काय वाटेल ते करोत, त्यांची त्याला पर्वा कशी ती कधी वाटलीच नाही. रातबेरात सुद्धा तो जंगलांतून प्रवास करीत असे. हव्या त्या ओसाड जागेत विसावा घेई. थंडीच्या दिवसांत स्मशानात पेटलेल्या सरणाजवळ बसूनही शेक घेई. खाण्यापिण्याची तर पर्वाच नसे. मिळेल ते शिळेपाके कच्चे-पक्के खुशाल चवीने खाई नि ते त्याला पचतही असे. अनवाणी चालण्याने पायतळांना भोके पडली तरी त्याचीही खिसगणती त्याला नसे.
Comments
Social Counter