All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    20 - माणुसकीचा संदेश


    अध्याय 20 - माणुसकीचा संदेश

    सगळी घाण निपटल्यावर डेबूजी सखुबाई बसली होती तेथे आपण होऊन आला. नमस्कार केला सगळ्या लहान थोरांना आणि मुकाट्याने बसला. सखुबाईने अंगावरून हात फिरवला. ती सारखी रडत होती. सभोवार जमलेल्या सगळ्यांनी घरी परत येण्याविषयी आग्रह केला. ``मी तुझ्याबरोबर आलो नि उद्या परवा मेलो, तर तू काय करशील? आजोबा, आजी, मामा गेले, त्यावेळी काय केलंस तू आणि करणार तरी कोण काय? स्वतःपुरते सगळेच पहातात. पण शिलकी आयुष्य गरजवंत लोकांच्या सेवेत झिजवले, तर तीच खरी देवाची सेवा. देवळातल्या दगडी देवाचे हातपाय रगडून काय होणार? सभोवार पसरलेली ही माणसांची दुनिया, हे खरे ईश्वराचे रूप. त्या हजारो लाखो देवांची पडेल त्या रीतीने केलेली सेवाच देवाघरी रुजू होते. सुवासिक फुले, पत्री आणून देवाच्या दगडी मूर्तीवर वाहण्यापेक्षा, सभोवार पसलेल्या हालत्या,  बोलत्या, चालत्या दुनियेच्या सेवेसाठी हाडे झिजवली, भुकेल्यांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जन्माचे सार्थक होईल. त्या पत्रीफुलांपेक्षा माझा खराटा झाडूच श्रेष्ठ आहे. उमचायचे नाही तुम्हाला ते आज.’’ इतके बोलून डेबूजी उठला नि गेला निघून.
    ``मी तुह्या संग आलो अन् सकाळय परवा मेलो त तु काय करशीन? आबा, आजी, मामा मेले त्या वाकती त्वा काय केलं अन् कोन काय करनार? आपल्या पुर्त सर्वेच पाह्यतत पन् उरलं हुए आयुष्य अळल्या नळल्या गरजी लोकाईची सेवा क-याले खरसलं तर तेच खरी देवाची सेवा आहे. देवळाईतल्या दगळ गोठ्याच्या देवाचे हात पाय दाबून काही होत नाही. भोवताली पसरलेली ही माणसांची दुनिया हेच खरं देवाचं रूप आहे. त्या हजारो लाखो देवांची करता येईल त्या मार्गानं सेवाच करनं देवाच्या घरी रुजु होईन. वासाचे फूलं वेल आनून देवाच्या गोट्याच्या मूर्तीवर वाह्यल्यापक्षे भवतालच्या चालत्या बोलत्या लोकांच्या सेवेत आयुष्य खरसलं, भुकेल्या हुया लोकांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जलमाचं सार्थीक होईन. त्या फुलपत्रापक्षे माझा खराटा अन् झाळनंच मुद्याचं आहे. आज काही तुम्हाले ते समजनार नाही.’’


    यात्रा संपली, डेबूजी पसार

    कोठे सटकला त्याचा थांग ना पत्ता. पुन्हा पायपिटी नि वनवास. दररोज १५ ते २५ मैलांची दौड सारखी चालू. रात्र नाही. दिवस नाही. ऊन्ह, थंडी, पाऊस नाही. तुफाने, वादळे, झंजावात नाही. त्याचे पाय सारखे चालतच रहायचे. जाताजाता शेतातली कणसे, कांदे, मिरच्या, शेंगा, गाजरे काय मिळेल ते खायचे आणि विसाव्यासाठी मनाला येईल तेथे अंग टाकायचे. कोणत्याही गावात एक दिवस किंवा एक रात्र यापेक्षा अधिक काळ रहायचे नाही. भूक लागली का हव्या त्या दारी जायचे आणि मायबाप चटणी भाकर द्या ही आरोळी मारायची. कोणी द्यायचे, कोणी हुसकवायचे. शिळी पाकी कशी का असे ना, भाकर, चटणी, कालवण मडक्याच्या टवकळात घ्यायचे आणि दूर नदीकाठी अथवा गावाबाहेरच्या विहिरीजवळ बसून ती खाल्ली का झाली स्वारी पसार दुसरीकडे.

    कित्येक वेळा पोलीस नि पोलीसपाटील डेबूजीला चौकीत बंदीवानही करायचे. काही ठिकाणी तर चोर समजून पोलिसांनी त्याला उपाशी ठेवावे, कबुलीसाठी रात्री खूप मार द्यावा. याचे काही नाही, मार खात असतानाही हा हसायचा. पक्का बेरड आहे लेकाचा म्हणून आणखी छळायचे. डोईवर जडजड पेटारे देऊन पाचपाच मैल दुस-या गावी चौकीवर चालत न्यायचे. तेथे आणखी तपास व्हायचा. कोणी सज्जन गावकरी भेटावा नि त्याने ``अहो हा वेडा आहे. असाच गावोगाव भटकत असतो.’’ असे पोलिसांना सांगितले म्हणजे सुटका व्हायची. लगेच स्वारी आपल्या तंद्रीत हास हासत पुढे रवाना व्हायची. कोणी निंदा, वंदा वा अटकेत करा बंदा, कशाची काही दिक्कत खंत वाटायचीच नाही. शारीरिक, मानसिक, वैचारिक अवस्था एकतान, निर्लेप, निर्विकार नि स्थितप्रज्ञ. पुष्कळ वेळा तो मुद्दामच लोकांचा राग आपणावर ओढून घ्यायचा. षड्रिपूंचे दमन किती झाले आहे, याची क्षणोक्षणी पदोपदी तो कसोटी लावून पहायचा. कसोटी लावून पहायचा! लिहा बोलायला शब्द फार सोपे आहेत. वाचायलाही काही कठीण जात नाहीत. पण तसल्या एकाद्या प्रसंगाची नुसती कल्पना करून पहा, म्हणजे डेबूजीच्या साधकावस्थेतील तपश्चर्येची कदर किती भयंकर होती, याची थोडी फार कल्पना झाली तर होईल.

    THOUGHTS ON LINGUISTIC STATES