अध्याय 18 - थोडे घरात डोकावू या.
करता सवरता डेबूजी परागंदा झाल्यावर बळिरामजीने सगळ्या कामांचा उरक पत्करला, तरी आजा, आजी, आई दुःखात झुरतच होती. नातावळ्या गोतावळ्यांनी यावे, दोन दिवस रहावे, समाधान करावे नि जावे. अखेर हंबीरराव आणि पाठोपाठ २-३ महिन्यांनी रायजाबाई देवलोकी गेली. आता मात्र सखुबाईला आकाश फाटल्यासारखे झाले. निराशेच्या काळ्या ढगारालाही आशेची चंदेरी शलाका असते म्हणतात. डेबूजी गेला तेव्हा सौ. कुंताबाई ३ महिन्यांची गरोदर होती. रायजाबाईच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. आईबापाचा मृत्यू आणि पाठोपाठ नातवाचा जन्म. जन्म-मृत्यूची ही पाठशिवणी सखुबाईच्या चांगलीच परिचयाची होती. मुलाचे नाव गोविंद ठेवून, सखुबाईने जवळचे काही गोतावळे जमवून त्याचे बारसे केले.
अखेर तपास लागला.
एक दिवस मूर्तिजापूरला कामाला गेलेला बळिरामजी घरी आला आणि टांगा न सोडताच एकदम मोठ्याने ओरडला, ``आत्या, डेबूदादाचा तपास लागला. तो साधू झालाय नि माहूर भागात फिरताना त्याला आपल्या एका वट्टीने पाहिले.’’ चला, पत्ता लागला आता शोध करून त्याला घरी परत आणायची खटपटच तेवढी करायची. माहूर भागातल्या जातगोतवाल्यांना इषा-याचे निरोप रवाना झाले. वार्षिक ऋणमोचनाची पौषी यात्राही जवळ आली. डेबूजी कुठेही असला तरी ही यात्रा चुकवणार नाही ही सगळ्यांची खात्री.
ऋणमोचनचा रविवा-या शंकर.
दापुरीपासून ऋणमोचन अवघ्या ३ मैलांवर. पौष महिन्यातल्या दर रविवारी तेथे यात्रा जमत असे. पूर्वी ती लहान असे. उगाच १०-१२ खेडूतांचे खटारे यायचे. गाडगेबाबांच्या माहात्म्याने मात्र गेली अनेक वर्षे त्या यात्रेला महात्सवाचे रूप आलेले आहे. एखाद्या पौषात ५ रविवार आले का त्या शेवटच्या रविवाराच्या देवदर्शनाचा महिमा मोठा. शंकराचा आवडता वार सोमवार. पण या ऋणमोचनच्या मुद्गलेश्वर महादेवाची यात्रा मात्र रविवाची. हे काय त्रांगडे आहे समजत नाही.
बहुतेक यात्रेकरू सर्व जमातीचे. रविवारी यात्रेला आले का प्रत्येकाने पूर्णा नदीत बुचकळी मारायची आणि ओलेत्याने शंकराला बेलपत्री वहायची, असा रिवाज. या शंकराचे नाव मुद्गलेश्वर. म्हणूनच डेबूजीच्या अल्पायु मुलाचे नाव त्याने मुद्गल असे ठेवले होते.
चुकणार नाही, येईलच तो.
पौष उजाडला नि रविवारही आला. सखुबाई बळिरामजी वगैरे मंडळी मोठ्या पहाटेलाच ऋणमोचनला येऊन बसली. पण डेबूजी कोठेच आढळे ना! पूर्णा ऊर्फ पयोष्णा नदीचे पात्र ऋणमोचनजवळ फार रुंद नि खोल. काठच्या जमिनीचा चढाव तीन पुरुष उंचीचा. मोठा कठीण नि निसरड्या चिकण्या मातीचा. स्नान करून ओलेत्याने वर येणारी मंडळी हटकून पाय घसरून पडायची. दरसालची ही कटकट.
पण यंदा नवल वर्तले. कोणीतरी एक चिंध्याधारी जटाधारी माणूस फावडे, टोपली घेऊन ओल्या मातीवर सुकी माती भराभर टाकीत सकाळपासून सारखा झगडतोय. लोकांच्या वर्दळीने चढावाचा काठ भिजला का पडलीच याची सु्क्या मातीची टोपली त्यावर. कोण बुवा यंदा हा महात्मा आला ऋणमोचनला?
निरखून पाहतात तो कोण? अहो, हा आपला डेबूजी वट्टी! जटा-दाढी-मिशांचे जंगल अमाप वाढलेले, अंगावर फाटक्या चिंध्या, घामाच्या धारा निथळताहेत. आणि आजूबाजूला किंचितही न पाहता. टोपल्या भरभरून सुकी माती आणून टाकण्याच्या कामात एकतान रंगला आहे. पिल्लू हरवलेल्या वाघिणीच्या उसाळीने सखुबाईने ``डेsबू..... माझा डेsबू’’... अशी किंकाळी मारून त्याच्याकडे झाप टाकली.
ऐन कसोटीचा प्रसंग हाच.
कोणालाही नकळत घरदार सोडून देशोधडीला निघून जाण्याने संसाराचा मोहपाश तोडला जातोच, असे थोडेच आहे? मोहपाशापासून लांब दूर असे तोवर ही भावना किंवा कल्पना ठीक असते. निर्जन अरण्यातल्या वस्तीत ब्रह्मचर्याची शेखी कोणीही मिरवावी. पण सौंदर्यवान तरुणींच्या मेळाव्यात खेळीमेळीने राहून ब्रह्मचर्य टिकवील. त्याचीच खरी शहामत आणि तोच अखेर कसोटीला उतरणार.
देह-मनाची मुंडी मुरगाळून कामक्रोधादि षड्रिपूंचे दमन करण्याच डेबूजीने एक वर्ष वनवासात घालवले. पण या घडीला त्याच्याभोवती जन्मदाती आई, शेजेची बायको, लडिवाळपणे हाताखांद्यावर खेळवलेल्या दोन गोंडस लहान मुली आणि गृहत्यागानंतर झालेला वंशाचा आधार असा तो छोटा पुत्र गोविंद, शिवाय गावोगावचे सारे जिवाभावाचे सवंगडी यांचा लोखंडी साखळदंडासारखा वेढा पडलेला. आई रडत ओरडत आहे. बायकोच्या डोळ्यांतून आसवांचे पाट वहात आहेत. मामी, मामेभाऊ, स्नेही-सोबती यांच्या विनवण्या चालू आहेत. डेबूजी निश्चल वृत्तीने सगळ्यांकडे निर्विकार मुद्रेने पहात आहे. फत्तरावर घणाचा घाव घातला तर एकादी कपरी तरी उडते. पण येथे काही नाही!
Comments
Social Counter