अध्याय 31 - खबरदार, पायांना हात लावाल तर.
कीर्तनकार पुराणिक काय किंवा अध्यात्माच्या आवरणाने बनलेले साधू, संत, महंत काय, त्यांच्या पायांचे दर्शन आणि तीर्थ घ्यायला लोक नेहमीच धाधावले आढळतात. आणि तेही पठ्ठे, समाजाच्या मनोभावनांचा अंदाज घेऊन डोई टेकून नमस्कारासाठी आपापले पाय पुढे करतात. कित्येक संत नमस्काराला आलेल्या भगतांच्या डोक्यावरच आपले पाय ठेवतात. असे झाले म्हणजे झालो बुवा, पावन झालो, भवसागरातून मुक्त झालो, जन्म-मरणाचा फेरा चुकला, जीवन धन्य झाले, अशा समजुतीने भगत हुरळतात. डेबूजी गाडगे बाबांनी या अंधश्रद्धेच्या प्रघाताला पहिल्यापासूनच अगदी निकराने विरोध केलेला आहे. भेटेल त्याला ते स्वतः दोन हात जोडून मस्तक वाकवून दुरून प्रणाम करतात. पण कोणालाही आपल्या पायांना हात लावू देत नाहीत. माणसांनी माणसांच्या पायांवर का म्हणून डोके ठेवावे? आदर काय दुरून दाखवता येत नाही? अशी त्यांची आचार-विचारसरणी आहे.
ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या
कीर्तन संपल्यावर कथेकरी बुवाच्या पायांवर लोळण घालण्याचा आणि आरतीत दिडक्या पैसे टाकल्यानंतर बुवांना आलिंगन द्यायचा एक जुना हरदासी प्रघात आहे. गाडगेबाबांनी कीर्तनात ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या. तरीसुद्धा बाबांच्या कीर्तनातल्या हृदयस्पर्शी प्रवचनाना भारावलेल्या नि थरारलेल्या श्रोत्यांना त्यांच्या पदस्पर्शाची अपेक्षा नेहमीच मोठी ती टाळावी म्हणून कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी गाडगेबाबा जवळपास एखादी गुपचूप दडून बसण्याची जागा आधीच हेरून ठेवतात. अखेरचा हरिनामाचा कल्होळ चालू करून दिला का सटकन निसटून त्या जागी दडून बसतात. पुंडलीक वरदा हारि विठ्ठल होऊन लोक पाहतात तो काय? गाडगेबाबा गडप, गुप्त, अदृश्य! भराभर लोक त्यांना शोधायला सैरावैरा धावायचे. कित्येक वेळा त्यांच्या दडणीच्या जागेवरूनही जायचे. अखेर, बुवा देवावतारी. झाले. गुप्तच झाले. अशा कण्ड्या पिकायच्या नि भोळसट त्या ख-या मानायचे. अनेक वेळा `कीर्तन आटोपल्यावर मला तुझे कांबळे दे बरं का पांघरायला थोडा वेळ’ असे कुणाला तरी आधीच सांगून ठेवायचे आणि दडायची वेळ आली का ते कांबळे पांघरून घुंगट मारून तिथेच कुठेतरी काळोखात बसून रहायचे. कांबळे काळे नि काळोखही काळाच. इकडे बुवा गुप्त झाले म्हणून लोकांची उगाच धावपळ. अशा वेळी त्यांना विनोदाचीही हुक्की यायची. `अहो तो गोधड्याबुवा कुठं लपलाय ते मी दाखवतो चला.’ असे कांबळ्याच्या घुंगटातूनच काही लोकांना ते स्वतः सांगत. त्यांना वाटायचे का हा कुणीतरी असेल खेडूत श्रोत्यांपैकी एखादा घोंगड्या शेतकरी. लोक म्हणायचे-होय तर. तो लागलाय असा सहज सापडायला. देवरूपी तो. गेला पार कुठच्या कुठं पारव्यासारखा उडून. मग बुवाजी हळूच कांबळे बाजूला सारून प्रगट व्हायचे नि म्हणायचे, ``अहो, बाप्पानो, माणूस कधी एकदम असा गुप्त होईल काय? बोल बोलता तो काय हवेत विरून जाईल? बामणांची पुराणं ऐकून ऐकून भलभलत्या फिसाटावर विश्वास ठेवण्याची लोकांची खोड कधी सुटणार कोण जाणे.’’
अनेकनामी साधू
डेबूजीच्या या प्रांतोप्रांतीच्या भटकंतीत ठिकठिकाणचे लोक त्याला निरनिराळ्या नावांनी ओळखू लागले. व-हाडात त्याला डेबूजीबुवा किंवा वट्टीसाधू म्हणतात. नागपुराकडे चापरेबुवा म्हणतात. मद्रास नि कोकण विभागातगोधडेमहाराज. सातारा जिल्ह्याकडे लोटके महाराज. गोकर्णाकडे चिंधेबुवा. खानदेश, पुणे, बडोदे, कराची मोंगलाईत गाडगे महाराज इत्यादी अनेक नावांनी ते ओळखले जातात. सहवासातील नि निकट परिचयातील मंडळी त्यांना श्रीबाबा किंवा नुसते बाबा म्हणतात.
डेबूजीच्या कीर्तनातली नवी जादू
सर्व प्राणी भवसागरात जेहत्ते पडले आहेत. असा हरदासाने गंभीर ध्वनि काढून कथेला प्रारंभ करताच, हा एकटा हरदासच तेवढा काठावर धडधाकट उभा नि बाकीचे सगळे जग समुद्रास्तृप्यन्तु झाले असे कोणीही शहाणा कधी मानीत नाही. कथा-कीर्तन-पुराणकारांची ब्रह्ममायेची नि समाधिमोक्षाची बडबड सुद्धा – एक ठराविक संप्रदाय म्हणूनच एका कानाने ऐकतात नि दुस-याने बाहेर सोडतात. त्यात त्यांना ना कसले आकर्षण, न आवड, ना काही राम. जुलमाचा रामरामच असतो तो! त्याच पौराणिक कथा नि तीच आख्याने आणि तेच बिनकाळजाचे पोपटपंची निरूपण. डेबूजीच्या कीर्तनातल्या आख्यान-व्याख्यांनांची त-हाच न्यारी. भूतकाळाच्या अंधारात चाचपडण्यापेक्षा, वर्तमानकाळाच्या गचांडीलाच त्याचा नेमका हात. हरिश्चंद्राचा नि नळ-दमयंतीचा वनवास कशाला? खरं खोटा, तो झाला गेला, कालोदरात गडपला. समोर कीर्तनाला बसलेल्या हजारो शेतकरी कष्टक-यांच्या वनवासावर नि उपासमारीवर त्याचा कटाक्ष. अडाणीपणामुळे डोकेबाज सावकारशाही त्यांना कसकशी फसवून लुटते. अनाक्षरतेमुळे गहाण-फरोक्ताचा भेद कसा उमगत नाही. आपली बाजू खरी न्यायाची असूनही खेडूत लोक कोर्टकचेरीच्या पाय-या चढायला कसे घाबरतात नि सावकार म्हणेल ते मेंढरासारखी मान डोलावून कबूल करतात. गोडगोड बालून रोजंदारीचा ठरलेला १२ आणे दाम हातावर ८ आणे टिकवून तो कसा फसवतो. अखेर स्वतःच्या मालकीच्या शेतीवर शेतक-याला आपला गुलाम बनवून कसा राबवतो आणि धान्याच्या भरल्या राशीपुढे उपाशी कसा मारतो, या अवस्थेचे शब्दचित्र आपल्या बाळबोध गावंढळ भाषेत तळमळीने रंगवू लागला का हजारो खेडूतांच्या डोळ्यांतून ढळढळा आसवांचे पाट वाहू लागायचे. ``तुम्ही निरक्षर राहिलात ते बस्स झाले. पण आता आपल्या मुलांमुलींना शिक्षण देऊन हुशार करा. गावात शाळा काढा.’’ हा त्याचा उपदेश श्रोत्यांच्या थेट काळजाला जाऊन भिडायचा.
Comments
Social Counter