अध्याय 23 - अखेर दगडी घाट झाले
डेबूजीच्या खटपटीमुळे ऋणमोचनच्या पौषी यात्रेला सालोसाल वाढते महत्त्व येऊ लागले. दरसाल यात्रा जमावी. स्नानासाठी नदीकाठच्या घसरणीवर लोकांची घसरगुंडी चालूच रहावी आणि तेथे डेबूजीने सुकी माती टाकायचे हाडमोडे काम करीत रहावे, हे काही ठीक दिसत नाही. हा विचार लोकांच्या मनात घोळू लागला. नदीला फरसबंदी घाट बांधला पाहिजे. एवढी डेबूजीच्या तोंडून अस्पष्ट सूचना निघायची थातड, भराभर जागच्या जागी वर्गण्यांचे आकडे आणि रोख रकमा जमू लागल्या. सांगवी दुर्गडे येथील डेबूजीशी जमिनीबाबत तंटा केलेल्या सावकारांनी – बनाजी प्रीथमजी तिडके आणि त्यांचे बंधु तुकाराम प्रीथमजी तिडके यांनी पुढाकार घेऊन वर्गणीचे ठोक रकमेचे आकडे प्रथम टाकले. सन १९०८ साली पूर्णानदीचा पहिला घाट बांधून तयार झाला. जमलेल्या रु. ७५०० पैकी घाटाचे काम होऊन रकम शिल्लक उरली, तेव्हा वर्गणीदारांच्या इच्छेप्रमाणे घाटाशेजारीच श्री लक्ष्मी-नारायणाचे देऊळ बांधण्यात आले. यानंतर सालोसाल अनेक लोकांनी देणग्या देऊन नदीच्या दोनी तीरांवर योग्य ठिकाणी आणखी चार घाट बांधले. ४-५ वर्षांनंतर डेबूजीने परीट समाजात ऋणमोचन यात्रेच्या निमित्ताने एकेका नवा समाज-संघटनाचा प्रघात चालू करावा. भंडा-याच्या जोडीने त्याने नाम-सप्ताहाची प्रथा चालू केली. मांसभक्षण नि दारूबाजी. या व्यसनांच्या हकालपट्टीची निकराने चळवळ केली. देवीच्या नावाने जागोजाग होणा-या पशुपक्ष्यांच्या हत्या महापाप ठरवून बंद पाडल्या. भंडारा करून उरलेल्या पैशानी मोठमोठी भांडी खरेदी करवली. सन १९१४ साली पत्र्याची धर्मशाळा बांधून ती पंचांच्या ताब्यात दिली. लोकहिताच्या असल्या अनेक खटपटी कराव्या. त्या लोकांच्या हवाली व्यवस्थेसाठी सोपवाव्या आणि आपण मात्र झटकून नामानिराळे रहावे. फार काय, पण पार दूर कोठेतरी निघून जावे, असा त्याच्या जीवनाचा ओघ चालू झाला. `` डेबूजी आमच्या परीट जातीचा पाणीदार मोती आहे,’’ असे एकाने सहज म्हणताक्षणीच, ``नाही हो बाप्पा, मी एक फुटके खापर आहे. मोत्यासारखा कुणाच्या छातीवर हारात रुळत राहण्यापेक्षा, मोत्याच्या थेंबासारखा दवाचा कण म्हणून तान्हेल्या चिमणीच्या घशात नेमका पडावं, ही तर माझी सारी खटपट आहे.’’ असा जबाब द्यायचा.
ऋणमोचनप्रमाणेच मार्की (ता. अमरावती), पिंजर (ता. अकोला) आणि माहूर (निजाम प्रदेश) येथील यात्रांतून डेबूजीने भंडारे, नामसप्ताह आणि धर्मशाळा चालू करून, स्वतः त्या कोठल्याही उद्योगाच्या मोहात नाममात्रही राहिला नाही.
डेबूजी पुढे, कीर्ति मागे.
ठिकठिकाणच्या या कार्यामुळे डेबूजीचे नाव लांबवर फैलावले. कोण हा असावा, तो पाहिला पाहिजे एकदा, असे जिकडे तिकडे लोक बोलू लागले. वाट फुटेल तिकडे जाण्याच्या नित्य क्रमात तो कोठेही गेला, कोणालाही भेटला, तरी त्याने आपले नाव चुकूनही कधी कोणाला सांगितले नाही आणि आजही सांगत नाहीत. तोच हा लोकसेवक डेबूजी असे लोकांनाही पटायचे नाही .एवढी मोठमोठी संघटनेची कामे करणारा आणि परिटांसारख्या मागासलेल्या समाजात जागृतीचे अमृतसिंचन करणारा असा वेडाविद्रा, रकटी चिंध्या पांघरणारा, मडके गळ्यातबांधून फिरणारा, दिगंबर असेलच कसा? याला तरी लोक पुढारी मानतील कसे नि याचे ऐकतील कसे? दरसाल हजारगावे पायपिटीत पालथी घातली, लाखो ब-यावाईट लोकांशी संबंध आला, पण कोणालाही डेबूजीच्या नावागावाचा थांगपत्ता लागला नाही.
डेबूजीची कीर्ती व-हाड, खानदेश, नागपुरापर्यंतच्या मागासलेल्या समाजात फैलावत गेली. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतर हजारो अडाणी नाक्षर म्हणूनच स्वाभिमानाला मुकलेल्या श्रमजीवी कष्टाळू जनांचे संसार ठाकठीक सावरण्याची अक्कल शिकवणारा हा नवीन साधू पहाण्यासाठी ठिकठिकाणचे लोक उत्कंठित झालेले असत. काही दिवसांनी कोणी सगेसोयरे आले, त्यांनी डेबूजीच्या वेषाची, वृत्तीची नि ग्रामसेवेची माहिती दिली म्हणजे ``अरे हो रे हो. परवाच तो आमच्या गावी येऊन गेला. आम्ही समजलो का असेल कोणी वेडापीर. त्याने चावडी सारवून साफ केली. विहिरीचा पाणवठा खराटा घेऊन स्वच्छ केला. ढोरांना पाणी पाडले. त्या सोनबा पाटलाच्या सुनेचे कडब्याचे ओझे डोक्यावर नी तिचे पोर खाकोटीला घेऊन त्याने तिला ७ मैल सोबत केली नि घरी आणून घातली. बाबा, काय भाकर बिकर खातोस का म्हणून विचारले तर काहीही न बोलता नुसता हसला नि नमस्कार करून धावत पळत गेला निघून. अरेरे, दापुरी ऋणमोचनचा तोच का डेबूजी? किती अभागी लोक आम्ही. आम्ही त्याला ओळखले सुद्धा नाही हो. छे छे छे. फारवाईट गोष्ट झाली.’’ असे तडफडायचे.
Comments
Social Counter