All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    अध्याय 30

     अध्याय 30

    देवधर्माच्या या टाळाकुटी फिसाटाच्या जोडीनेच दुसरे एक महापाप लोकांच्या बोकांडी बसलेले आहे. ते म्हणजे दैववादाचे. जो पहावा तो दैव दैव करीत कपाळाला हात लावीत असतो. सर्व होणे जाणे तुझ्या हाती  ही देवापुढची कबुली. माणूस म्हणजे कोणी नाही. हवेत उडालेला क्षुद्र पाचोळा. त्याच्या नशिबाची वावडी देवकृपेच्या वा-यावर उडणारी. त्याला स्वतःला काही कर्तृत्व नाही, दैवाच्या अनुकूळतेशिवाय त्याच्या हातून काही घडणारे नाही. दैवाचे प्रतिकूळ वारे अथवा वादळ टाळण्यासाठी देवाच्या आराधनेशिवाय दुसरा मार्गच नाही. देवभक्तीचा आटारेटा करूनही स्वतःचे नि संसाराचे वाटोळे झाले तरी दैवरेषेपुढे कोणाचे काय चालणार? या समजुतीचे समाधान मानायलाही त्याची तयारी. शहरी शहाणा घ्या अथवा खेडूत अडाणी घ्या, सारे दैव-दैव-वादाच्या जंजाळात गुरफाटलेले. माणुसकीचीही चाड कोणात उरलेली नाही. मग भूतदयेची शुद्ध राहतेच आहे कुणाला? ``ज्या देशात भविष्यवादी ज्योतिषांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हव्या त्या आक्रमकांनी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा,’’ हाएका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इषारा भारताच्या इतिहासाला अगदी फिट लागू पडतो.

    देव-दैव-वादाच्या भ्रमाने आमची मनेच साफ मारून टाकली आहेत. कोणी कितीही शिकलेला असो, भविष्य पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. या एकाच नाजूक भावनेचा पुरेपूर फायदा धंदेबाज ज्योतिषी आणि अलिकडे वृत्तपत्रकार घेतात आणि पोटे भरतात. म्हणजे दैववादाने आमच्या लाज-शरमेचेही वाटोळे केले, असे म्हणायला हरकत नाही. खेडेगावांत ग्रामजोशाचा थाट दर्जा नि अधिकार सांगायलाच नको. पाळण्यापासून सरणापर्यंत, फार काय सरणावर जळून खाक झाल्यानंतरही, त्याच्या पंचांगातील मुहूर्तावर ग्रहमानावर आणि सल्ल्यावर खेडुताचे जीवन चालले. त्याने साडेसाती वर्तवली का मारुतीच्या तेल शेंदरासाठी आणि शनवारच्या एकादशणीसाठी, लागलीच जोशीबुवांची कातरणी खेडुताच्या फाटक्या खिशाला.

    देवांचे नवस हा सुद्धा दैववादाच्या पोटी जन्मलेल्या व्यसनांचा एक भाग आहे. अमूक झाले तर सत्यनारायण करीन. कोंबडे बकरे देईन. भट-भाजन घालीन. असल्या नवसांनी आपण देवाशी व्यापारी बहाणा करतो, याचे आजही कोणाला भान असल्याचे दिसत नाही. नवस केला का काम फत्ते, हीच ज्याची त्याची समजूत. मुलांसाठी नवस. जुगारीसाठी नवस, नोकरीसाठी नवस, बायको मिळण्यासाठी आणि मिळालेली पळाल्यास परत येण्यासाठी नवस, परीक्षेत पास होण्यासाठी नवस, खटला जिंकण्यासाठी नवस, आजारातून बरे होण्यासाठी नवस, अशा नवसांच्या परवडी सांगाव्या तेवढ्या थोड्या.
     या नवसांची एक मजेदार गोष्ट ऐका. पुणे शहरात मारुती नि म्हसोबा यांची गचडी फार. त्यांची नावेही चमत्कारिक नि कित्येक तर अश्लील असतात. कचकावून नवसाला पावणारा म्हसोबा पुण्याला जसा आहे, तसा एक शेण्या मारुतीशनिवार पेठेत आहे. परीक्षेची पोरे त्याला नवस करतात. ``देवा बाप्पा मारुतीराया, मी पास झालो तर तुला शेंदूर पेढे वाहीन.’’ मारुतीचा आणि परीक्षेचा संबंधच काय? काही पोरटी पास होतात, ती मारुतीला शेंदूर फासून लालेलाल करतात. मागाहून नापास झालेली पोरटी येतात आणि त्या शेंदरावर शेण थापून मारुतीला माखतात. पासवाल्यांचा शेंदूर आणि नापासवाल्यांची कचकावून शेणथापणी अशा दुहेरी रंगरंगोटीने त्या मारुतीच्या मूर्तीचे हालहाल होतात.

    देववादाच्या पाठपुराव्यासाठी निपजलेल्या दैववादाने हिंदु लाकांची अतोनात अवनति केलेली आहे.दगड-माती-धातूचे देव-देवी आणि त्यांच्यासाठी देवळांची पैदास भरमसाट झाल्यामुळे, माणूस स्वतःशी तर बेमान झालाच, पण माणुसकीची किंवा भूतदयेतीही त्याला कसली पर्वा अथवा संवेदना राहिलेली नाही. हिंदुस्थानातले हिंदुधर्मी लोक हव्या त्या जुलुमाला अन्यायाला नि गुलामगिरीला मिटल्या तोंडी सहन कसे नि का करतात? याचे कोडे विचारवंत चिकित्सक पाश्चात्त्यांना बरेच वर्षे सुटत नव्हते. सत्याची चाड नाही, असत्याची अन्यायाची चीड नाही, हवा तो आक्रमक येतो आणि बेलाशक त्यांना तुडवून शिरजोर होतो. पण हे लोक हूं का चूं काही करीत नाहीत! आजवरच्या परक्यांच्या सर्व भारतीय आक्रमणांचे गूढ हिंदूंच्या या दैववादी पिण्ड प्रकृतीतच सापडते. एवढे मोठे शुर पराक्रमी रजपूत राजे. मोगलांच्या किल्ल्याला वेढा पडला, त्यांची बाणाबाणी गोळागोळी चालू झाली, तरी ज्योतिषाला बोलावून प्रतिकाराचे तोंड कधि नी कोणत्या मुहूर्तावर द्यायचे याचा त्याला सल्ला विचारीत असत. असल्या नादान दैववादी राजवटीची मोगलांनी चकणाचूर केला नसता तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. कर्तबगारी थंड पडली का माणूस कुंडल्यांतल्या शनि-मंगळादि ग्रहांची चौकशी करु लागतो. या एकाच रोगाने महाराष्ट्र सध्या पुरा पझाडलेला असल्याने, हरएक क्षेत्रात त्याची पिछेहाट होत चालली आहे. ”निवडणूकीत यशस्वी होईन का?” याचे ग्रहमान पाहून उत्तरासाठी १० रुपयांची मनिऑर्डर पाठवा, अशी एका पुण्याच्या ज्योतिषाची केसरितील जाहिरात पाहील्यावर हा दैववादाचा रोग किती भडकलेला आहे, याची खात्री पटली.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES