अध्याय 19 - मी मेलो असतो, तर तू काय केले असतेस?
एवढेच आईला बोलून डेबूजी उठला. आता तो जाणार निघून, असे पहाताच सखुबाईने हंबरडा फोडला. ``अग, एवढी ओरडतेस कशाला? मी काही आताच जात नाही कुठे. हा पौष महिना इथेच आहे.’’ असे सांगून डेबूजी गेला निघून दुसरीकडे.
"डेबूजी वट्टी आला रे आला’’
ही हाक यात्रेकरूंत फैलावल्यामुळे, सगळे गणगोत नि लंगोटी मित्र त्याला पहायला धावले. दरसाल नदीच्या निसरड्याचा अनुभव सगळ्यांना होता, पण ओल्याचिंब मातीवर सुकी माती टाकून लोकांचे हाल कमी करण्याची कल्पना नि योजना आजवर एकाही शहाण्याच्या डोक्यात आली नव्हती. आणि आज? परागंदा झालेला आपला डेबूजी या विचित्र वेषाने यात्रेला येतो काय आणि यादवजी पाटलाकडून टिकाव, फावडे, टोपली घेऊन एकटाच ते काम करतो काय!
लोकहितासाठी असली कामे कोणी ना कोणी केलीच पाहिजेत, ही कल्पनाच ज्या खेडुतांना नाही नि नव्हती, त्यांना डेबूजीचा हा खटाटोप पाहून काय समजावे हेच समजे ना. कोणी म्हणे ``बिचारा वेडा झाला.’’ कोणी आई, बायको-मुलांकडे पाहून कळवळत. दुसरा विशेष शहाणा शेरा मारी की ``अहो पहिल्यापासूनच याला देवाधर्माची आवड, म्हणून झाला आता तो बैरागी साधू.’’ तिसरा तुंकाराने सांगे, ``अहो कसला देव नि कसला धर्म! याने आपल्या कुळदैवत खंडोबा नि आसराईचे बोकड दारू बंद करून विठोबा रखमाई करू लागला, वाडवडलांची चाल मोडली. फिरले डोके नि झाला असा वेडा पिसा.’’ ज्याला जसे सुचले तसे तो लोकांच्या जमावात येऊन शेरे मारी नि निघून जाई.
खराट्याचा नवा धर्म
सगळ्या यात्रेकरूंची स्नाने आटोपल्यावर, डेबूजीने स्वतः स्नान केले, अंगावरच्या चिंध्या धुतल्या नि तशाच पुन्हा पांघरल्या. देवळात जाऊन महादेवाला बिल्वपत्रे वाहिली. फराळाला बसलेल्या अनोळखी यात्रेकरूकडून चतकोर तुकडा भाकर, चटणी, कालवण मागितली आणि मडक्यात घेऊन नदीकाठी तो खात बसला. आईने त्याचयापुढे फराळांचे जिन्नस ठेवले, तिकडे त्याने पाहिलेही नाही. भाकर संपताच तो उठला आणि गेला निघून दूर कोठेतरी.
संध्याकाळी लोक पहातात तो डेबूजी हातात खराटा घेऊन यात्रेतली सारी घाण झाडून साफ करीत आहे. कागद पानांची भेंडोळी, खरकट्याचे तुकडे, फार काय पण जागोजाग लोकांनी केलेली मलमूत्रविसर्जनाची खातेरी, पार सगळे स्वच्छ झाडून साफ करण्याचा झपाटा चाललेला. सकाळी याने दरडीवर माती टाकून लोकांची स्नाने सोयीची केली. वाटेत दिसलेला दगड धोंडा गोटा दूर नेऊन टाकला. आता तर यात्रेतला सारा घाण, केरकचरा स्वतः भंग्याप्रमाणे साफ करीत आहे. हा काय वेडा आहे होय? येथल्या घाणीमुळे ऋणमोचनला कसली ना कसली रोगरायी होतेच. आपण कधी लक्षच दिले नाही. दरसाल असे होतेच, एवढ्यावरच आपली अक्कल ठेचाळायची. पण त्या रोगरायीला ही घाणच कारण, हे आज आपल्याला या डेबूजीने शिकवले. याला वेडा म्हणणारेच वेडे. बरे, याला साधू म्हणावे, तर आजवरचे साधू असली कामे करताना कोणी पाहिलेच नव्हते.
सारे लोक मंदिरातल्या दगडी शिवलिंगाच्या आरत्या धुपारत्यांत गुंतलेले, तर हा यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी आणि आरोग्यासाठी बाहेरची घाण काढण्यात हाडे मोडून घाम गाळीत आहे. गाभा-यातला तो दगडी देव श्रेष्ठ का देवळाबाहेरचा हा झाडूवाला श्रेष्ठ? विचारी होते ते हा विचार उघड बोलू लागला. डेबूजीकडे ते विशेष कौतुकाने नि आदराने पाहू लागले. ``अरे वेडा कसचा हा! हाच खरा महात्मा. सकाळपासनं तो तुमची सेवा करीत आहे. आता तर तुमची सारी घाण निपटून यात्रेचे ठिकाण स्वच्छ करीत आहे. ही लोकसेवा म्हणजेच खरी देवाची सेवा. उगाच टाळ मृदंग कुटून भजनाचा टाहो फोडून काय होणार आहे.’’ असे बरेच लोक बोलू लागले.
Comments
Social Counter