All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    27 - कथा कीर्तनांनी केले काय?

    अध्याय 27 - कथा कीर्तनांनी केले काय?

    कथा, कीर्तने, पुराणे आणि भजने या संस्था ब-याच जुन्या आहेत. लोकांत धर्मजागृति केल्याची पुण्याई त्यांच्या पदरी बांधण्याचा एक संभावित शिरस्ता आहे. ती धर्मजागृति कोणती? कथा, कीर्तन, पुराण भजन, वाटेल ते ऐका, त्यात प्रवचनाचा मुख्य ओढा गूढ अशा अध्यात्माच्या काथ्याकूटाकडे. ते अध्यात्म खुद्द कथाकाराला नि पुराणकारालाही उमजलेले नसायचे. फक्त पोथीतल्या जडबंबाळ शब्दांची ते नुसती पोपटपंची करतात. आत्मा, परमात्मा, योग, सिद्धी, समाधी, गुरूपदेश, सदेही विदेही मोक्ष इत्यादि शब्दांची भरमसाट पेरणी केली का चढला कथा-पुराणांना रंग. सारे श्रोते मोक्षानंदात डुलत रहायचे. कथा-पुराण संपून उठले का झाडलेल्या उपरण्याच्या फटका-यातच ते सारे ब्रह्मज्ञान झटकून जायचे. कोरडा पाषाण श्रोता घरी आल्यावर विचारले का, `काय आज कशा कशी काय झाली?’ तर उत्तर काय? `वा वा वा! बुवा मोठे विद्वान. बहुश्रुत. अधिकारी. संगीताची साथ पण छानदार. खूप रंग भरला, खूप रंग भरला.’


    कथा पुराणांनी गेल्या दोन तीनशे वर्षांत खरोखरच काही धर्मजागृति केली असती तर हिंदु जनतेला आजची हीन, दीन, लीन, क्षीण अवस्था आलीच नसती. भजनांनी मागासलेल्या समाजात धर्मजागृति केली म्हणावी तर तेथेही हाच परिणाम दिसून येतो. कथा पुराण भजनांनी लोकांत देवभोळेपणा, भिक्षुक बडवे बामणांचा वरचढपणा, भलभलत्या दान-दक्षणांचे घाणेरडे प्रघात, इहलोकाविषयी नि स्वतःविषयी तिटकारा आणि परलोकाच्या प्राप्तीसाठी काळीजतोड विवंचना, बायका-मुले संसार व्यवहाराचा पातकीपणा, तीर्थयात्रांचे दान-पिंडांचे भिक्षुक-भोजनांचे गोदानांचे फाजील स्तोम, धातू दगडधोंड्यांच्या मूर्तिपूजनांचा अट्टाहास, उपासाचा बडेजाव, अशा हजार भिकारड्या भानगडी फैलावण्याचे कर्म मात्र केलेले आहे.

    तीनही लोकी श्रेष्ठ असलेल्या (?) ब्राह्मण कथा-पुराणकारांनीच असले भलभलते प्रचार कथापुराणांतून फैलावल्यावर, अनाडी लोकांनी जाखाई, जोखाई, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा, खंडोबा वगैरे शेकडो गावठी दैवतांची पैदास करून त्यांनाही कोंबड्या-बक-यांचे बळी देऊन संतुष्ट करण्याचा कारखाना खेडोपाडी धूमधडाक्याने चालवला, तर त्यात नवल कशाचे? नाक्यानाक्यावरील ओसाड जागेत एकेक गावदेव ठाण मांडून बसला आणि आवस-पुनवेला कोंबडी बकरी दारूचा नैवेद्य हबकू लागला. माणसांच्या अंगातही तो घुमू लागला. असल्या घुम्यांचा एक पंथच निर्माण झाला. घरात तापसरायी येवो अथवा गावात पटकीचा आजार फैलावो, औषधोपचाराऐवजी सगळ्या गावक-यांची भिस्त देव-खेळव्या घुम्या भगतावर. भटाभिक्षुकांप्रमाणे घुम्या भगत सांगेल ती पूर्व. त्याचा हुकूम व्हायची थातड का गावदेव नि गावदेवीपुढे धडाधड झाल्याच चालू कोंबड्या बक-यांच्या कंदु-या आणि दारूचे पाट. पावसाचे अवर्षण पडले, खेळवा दे. गावकीचे तंटे पडले, लावा देवाला कळी आणि घ्या त्याचा निकाल. घरात मूल जन्माला आले, एकाद्याचे लग्न निघाले किंवा कोणी मेला, तरी दगड्याधोंड्या गावदेवाला कोंबडे, बकरे नि दारू दिलीच पाहिजे. सारा गाव मग झिंगून तर्र! आणि हे सारे कशासाठी? तर देवाधर्माच्या सांगतेसाठी. दस-याला रेड्याचे बलिदान हवेच. नाहीतर रोगरायीच्या तडाक्यात गावाची मसणवटी व्हायची. शिवाय, त्या रेड्याच्या बलिदानात गावमहारांचा नि गावपाटलांचा मोठ्ठा मान असायचा. पटकीचा रोग आला आणि सगळीकडे दुष्काळ असला तरी भीक मागून खंडीवरी तांदळाच्या भाताचे गाडे भरायचे, त्यावर गुलाल शेंदूर उधळायचा, जागोजाग कोंबडी, बकरी कापीत, रक्ताचे सडे पाडीत पाडीत, मरिआईच्या गाड्याची मिरवणूक गावाबाहेरच्या वेशीवर नेऊन सोडायची. याचा अर्थ, एका गावाची इडापीडा दुस-या गावाच्या वेशीवर नेऊन टाकायची असा असल्यामुळे, त्या गावचे लोक काठ्या, बडगे, भाले-बरच्या घेऊन मरिआईच्या गाड्याला विरोध करायला अस्तन्या सरसावून उभे असतात. आमच्या गावाच्या वेशीवर गाडा आणू नका, दुसरीकडे न्या, आणाल तर याद राखा, डोकी फुटतील. या धमक्यांच्या हाका आरोळ्या चालू होतात. गाडा कोणीकडेही नेला, तरी कोणत्या ना कोणत्या गावाची वेस असणारच तेथे. हरएक वेशीवर गावगुंड तयारच असतात मग काय? कचाकचीची मारमारी होते आणि प्रकरणे जातात फौजदारी कचेरीत. तालुक्याच्या वकिलांची पोळी पिकते. जखमी लोकांनी दवाखाने फुलतात. कधीकधी मारामारी टाळण्यासाठी मरिआईचा शेंदूर गुलालानी माखलेल्या खंडीभर भाताचा गाडा तेथेच वेशीवर टाकून बैलांसकट गावकरी माघारी पळतात, कुत्री कावळे सुद्धा तो भात खात नाहीत. कुजून जातो तसाच उकीरड्यावर.

    देवाधर्माच्या नावावर शहरांत नि खेड्यांत शेकडो वर्षे चालू असलेल्या असल्या प्रकारांची यादी फार मोठी नि लांब आहे. कथापुराणकार शहरी शहाण्याना मोक्षाच्या नादी लावून लुटीत असतात आणि खेड्यापाड्यातल्या अडाणी म्हणूनच मूर्ख रयतेला गावजोशी, कुलकर्णी, तलाठी, पाटील आणि देवभगत शेकडो फंदांत नादाला लावून हवे तसे पिळीत छळीत असतात.

    काही फिरते भजनी संत खेड्यापाड्यांत गेले आणि त्यांच्या कीर्तन-भजनांचा धुमाकूळ चालू झाला, का त्यांच्याही शिकवणीत संसार असार आहे, माणसाचे जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फटकन फुटेल त्याचा नेम नाही, बायका पोरे, धनदौलत, घरदार, शेतीवाडी सगळे इथच्या इथे राहणार, बरोबर काही येणार नाही, अखेर चला लंगोटा छोड ही अवस्था. तेव्हा या सगळ्यांचा त्याग करून पंढरीच्या वा-या करा. तो पंढरीनाथ तुमचे तारण करील. रात्रंदिवस विठ्ठल नामाची गर्जना करा. एकादशीचे कडकडीत उपास करा. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी पायी करा. असल्या उपदेशाचा तडाका चालू व्हायचा. हजारो खेडूत त्या बुवांच्या नादाला लागतात. घरदार धुवून त्यांच्या झोळ्या भरतात. रोजगार व्यवहाराकडे पाठ फिरवून बेकार भणंग होतात. ``तू तो राम सुमर, जग लढवा दे’’ असल्या बेफिकिरीने पंढरीचे वारकरी बनतात. तेथेही त्यांना लुटणारे आणि कुटून काढणारे बडवे आणि भजनी टाळकुटे तयारच असतात. उपाशी तापाशी बेभान टाळ कुटीत नाचणा-या असल्या कंगाल वारक-यांची `अहाहा, केवढी ही विठ्ठलभक्ती आणि केवढा हा नामाचा महिमा’ असे म्हणून वाहवा करणारे लफंगे लोक आजूबाजूला उभेच असतात. त्यांच्या चिथावणीने त्या पोकळडोक्या वारक-यांना आणखीच चेव येतो आणि मोक्षाचे सारे गाठोडे या कंगाल वारकरी जीवनातच आहे, अशा समजुतीने तो त्याच भिकारड्या निष्क्रिय भीकमाग्या आयुष्याचा अभिमानी बनतो. महाराष्ट्रातले लक्षावधी धट्टेकट्टे पुरुष आणि बाया या वारकरी फंदात सापडून स्वार्थाला नि परमार्थाला सफाचट मुकलेले दृष्टीस पडतात.वारकरी पंथाने धर्म जगवला म्हणतात तो हा असा!  संसारात, व्यवहारात कायमच्या नालायक ठरलेल्या आणि देशाला जडभार झालेल्या लक्षावधी नादान बायाबुवांचा वेडपट समुदाय म्हणजेच वारकरी पंथ, अशी व्याख्या करावी लागते. खेडूत मूळचेच नाक्षर, अडाणी म्हणून अविचारी. केवळ मेंढराची जात. दाढीवाल्या बोकडाच्या मागे मुंड्या खाली घालून सगळे जाणारे. तो त्यांना चरायला कुरणात  नेतो का मरायला सरणात नेतो याची चौकशी ते करीत नाहीत. असले अनाडी लोक देहाच्या सार्थकासाठी (म्हणजे कशाच्या? तेही त्यांना अवगत नसतेच.) वारकरी कळपात घुसले, तर त्यांना फारसा दोष देता येणार नाही.

    पण आश्चर्याची गोष्ट अशी की अलीकडे गेल्या ५०-७५ वर्षांत कित्येक पांढरपेशा पदवीधर भटा-बामणांनी टाळमाळधारी वारक-यांचे सोंग घेऊन शिंगे मोडून वासरांत घुसण्याचा एक जंगी व्यापार चालू केला आहे. एडिटरकी, मास्तरकी किंवा प्रोफेसरकीच्या उद्योगापेक्षा हा विठ्ठले माझे आई भजनाच आणि ज्ञानदेव तुकाराम संकीर्तनाचा धंदा त्या लोकांना चांगला किफायतशीर झालेला आहे. आधीच भटाची जात सुशिक्षित. कथा, पुराण, प्रवचने सांगण्यात पिढ्यानपिढ्या जिभली सरावलेली आणि सवकलेली. तशात पाश्चिमात्य इंग्रेजी ज्ञानाची भर. कोणताही अध्यात्माचा मुद्दा उलट सुलट झकास विधानांनी रंगवून सांगण्याची सफाई. शहरी शहाण्यात मानकरी, म्हणून खेडुतांनाही त्यांच्या पांडित्याचा मोठा वचक, दरारा नि आदर. असलेही लोक जेव्हा हरिनामाशिवाय मोक्ष नाही, संसार असार आहे, बायका, पोरे वैरी आहेत, अंतकाळी आपले आपण, देहाचे सार्थक करण्यासाठी या मायामोहातून बाजूला झालेच पाहिजे, असा उपदेशाचा तडाका चालू करतात, तेव्हा अडाणी खेडुतांनाही ते हडसून खडसून पटते आणि ते त्यांच्या भजनी लागतात. गुरुदेव म्हणून त्यांच्या पाया पडतात, पायांचे तीर्थ घेतात, त्यांच्या मठासाठी घरेदारे धुतात, काय वाटेल ते करतात. भिक्षुकाचा धंदा बसला. ज्योतिषावरही पोट भरण्याची पंचाईत पडू लागली. मास्तरकी, कारकुनीतही आता काही दम राहिला नाही. म्हणून डोकेबाज भटजी वारकरी बनले. येथे मात्र त्यांना अनुयायी भगतांची उणीव केव्हाच पडत नाही. संसार असार आहे, एक हरिनाम सत्य आहे, हे बडबडत असताना, या वारकरी सोंगाच्या भटा-बामणांचे संसार मात्र आपोआप सोन्या चांदीच्या मुलाम्याने चमकत असतात. विठ्ठलनामाचा केवढा बरे हा प्रताप!

    शिवपूर्वकाली आणि कदाचित शिवकाली, मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी, विठ्ठलनाम संकीर्तनाने आणि पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाने, हिंदु संघटनेचे काही कार्य केले असले, (मला तर शंकाच येते,) तरी त्यानंतर या संप्रदायाने हरएक म-हाठी हिंदूला माणसातून उठवण्याची आणि व्यवहारी कर्तृत्वाला मुकवण्याची दुष्ट कामगिरीच केलेली आहे. पाच पन्नास लाख लोक पिढ्यानपिढ्या संसार-व्यवहाराला रामराम ठोकून, देहसार्थकाच्या सबबीखाली आणि मोक्षाच्या आशेने गळ्यात माळा घालून टाळ कुटीत जगण्याचा धंदा करीत आढळावे, ही महाराष्ट्राच्या भवितव्यतेवरची मोठी भयंकर आपत्ती आहे.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES