अध्याय 29 - देवळांचा सुळसुळाट
धर्माची देवळे नि देवळांचा धर्म हे एक हिंदु धर्माचे आणि समाजस्वास्थ्याचे महाभयंकर पाप होऊन बसले आहे. हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून सोन काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यमवर्ग नामशेष झाला, शिक्षित पदवीधारांची बेकारी बोकाळली , असला आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणार्या ब्रम्हांडपंडिताना हिंदूच्या देवळांत किती अपार संपत्ति निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग गोरगरिबांच्या उध्दारासाठी न होता, लुच्चा लफंग्या चोर जार ऎदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, याची दखल घेण्याची अक्कल अजूनहि सुचलेली नाही. दुष्काळाने कोट्यावधि लोक अन्न अन्न करुन मेले तरी देवाना शिरा केशरि भाताचा नैवेद्यी अखंड चालूच आहे. लाखो श्रमजीवी कर्तबगार तरुण उदरभरणासाठी भयाभया करीत फिरत असले, तरी अब्जावधि रुपयांचे जडजवाहीर आणि सोन्यामोत्यांचे दागिने देवळी देवांच्या अंगावर चढलेले आहेतच. देशाला शेतकरि आणि कामकरी कळणा कोंड्याच्या आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळांतल्या पुजारी आणि सेवेकरी नि बडवे भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळएवढाही खळगा आजवर कधी पडला नाही. ”विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा” असा शेकडा ९६ जीवांचा गेली शंभर वर्षे सारखा कंठशोष चालला असंताहि देवळांतल्या घुमटांखाली लाखो महामुर्ख भट गोसावडे गंजड भंजड नि ट्गे गंध भस्म रुद्राक्ष्यांच्या पुण्याईवर पोट फुटून वांति होई तो परार्धावरी पल्ले धान्यांचे बिनबोभाट फडसे पाडीत असतात. देवळांच्या छ्परांखाली ब्रम्हचार्यांचे वंश किती वाढतात, पति नसतानाही किती विधवा पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरुमहाराज मठ गोकुळातल्या चिखलात कटीबंध बुडतात आणि किती पळपुट्या छंगीभंगी ट्ग्यांचे थर तेथे खुशालचेण्डुप्रमाणे निर्घोर जिवन कंठीत असतात याची, स्वताच्या किंवा पूर्वजांच्या स्मारकांसाठी देवळे बांधणारांनी आणि देवळे म्हणजे धर्मस्थाने समजून आंधळेपणानी त्यांची जोपासना करणारानी दखल घ्यायला नको काय? आज देव देवळांच्या निमित्ताने अब्जावधि रुपयांची संपत्ति हिंदुस्थानात निष्कारण अडकून पडली आहे. आणि ईकडे आमच्या भारत राष्ट्राचा पाय आंतरराष्ट्रीय कर्जाच्या बिनबुडाच्या कर्जात खोल खोल जात आहे. या परिस्थितीचा एकाहि मुत्सद्याने किंवा संताने विचार केलेला दिसत नाही. अनाथ बालकाश्रम , अनाथ विधवाश्रम , गोरक्षण कॄष्ठरोगी लंगडे पांगळे यांचे आश्रम , मागासलेल्या समाजांतील मुलांमुलींचे शिक्षण , कितीतरी समाजजीवनाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न आहेत. ते सोडवणाराना प्रश्न आहेत. ते सोडवणाराचा घरोघर दारोदार भीक मागावी लागते आणि देव आणि देवळांच्या दगडी प्रतिष्ठेसाठी करोडे रुपयांची संपत्ति शतकान- शतके तळ्घरात गाडलेली राहते, या नाजुक मुद्याचा आजवर एकालाही घाम फुटलेला नाही.
देश-देव - धर्माच्या या असल्या विलक्षण आणि माणूसघाण्या परिस्थितीच्या पार्श्वभागावर उभे राहून डेबूजी गाडगे बाबांच्या सेवा- धर्माची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. मोठमोठ्या शहरांपासून तो ५-१० झोपड्यांच्या कोनाकोपर्यांतल्या खेड्यापर्यंत सर्वत्र भट्कंती करीत असताना त्यांची समाज-जीवनाची बारीक सूक्ष्म टेहळणी सारखी चाललेली होती. अत्यंत मागासलेल्या शेतकरी खेडूती समाजात त्यांचा जन्म , त्या समाजाच्या मानसिक शारिरिक आर्थिक सर्व हालापेष्टांचा त्याना पुरा अनुभव . रक्त थिजून -हाडे पिचेपर्य्अन्त शेताची माती तिंबवली तरी सुखाचा घास तोंडात पडत नाहि. वरिष्ठ वर्गाची गुलामगिरी पिढ्यानपिढ्या अखंड चालूच . देवाधर्माच्या आणि रुढीच्या नावावर जागोजाग पशु पक्ष्यांची हत्या बेगुमान चाललेली, गरिबानी मरावे नि श्रीमंतानी मनमुराद चरावे हा समाजव्यवस्थेचा द्ण्डक, गरिबाना गरिबीची लाज नाही. खंत नाही. जीवन सुधारण्याची महत्त्वाकांक्षाही नाही. नाक्षर अडाणी म्हणून आस्ति-नास्ति विचार करण्याची अकलेला सवय नाही. ”ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ति असो द्यावे समाधान.” महार मांगादि जमातीनी इतरांपासून दुर खोर्यांतच का रहावे? कुष्ठरोगी वेडे लुळेपांगळे यांची समाजाने कसलिही दाद का घेऊ नये? देव देवळांचा जागोजाग एवढा ऎश्वर्याचा बडीवार चालला असतांहि , गोरगरिबांच्या तोंडांत वर्षातून एकदाहि कोणी साखरेची चिमूट, गुळाचा खडा किंवा तुपाचा थेंब कां घालू नये? यात्रेच्या ठिकाणी भिक्षुक बडव्यांच्या मनस्वी त्रास जाच सोसून लाखो लोक मेण्ढरांसारखे कां जातात? तेथे त्यांच्यापासून पैसे उकळून काढले जातात, पण अन्नपाणी आसर्याची निवर्याची सोय कां करीत नाहीत? अशा शेकडो प्रश्नांचे डेबूजी आपल्या मनाशी चिंतन करीत असे.तीक्ष्ण निरीक्षणांचे सिध्दांत.
Comments
Social Counter