अध्याय 22 - कुटाळांच्या अड्ड्यावर
हरएक गावात कुटाळ लोकांची टोळकी असायचीच. चावडीवर किंवा गावाबाहेरच्या पिंपळाच्या प्रशस्त पारावरत्यांची बैठक. नदीवर पाण्याला जाणा-या बायका पोरींची नि इतरांची टिंगल टवाळी करायचा त्यांचा धंदा अजूनही चाललेला दिसतो. डेबूजी असल्या वाटेने जाऊ लागला का ते टोळके त्याला हाका मारायचे. तो मुक्या बहि-यासारखा पुढेच चालत असायचा. मग टोळीतला कोणीतरी त्याला आडवा जायचा.
- काय रे, हाका मारल्या त्या ऐकू नाहीत का आल्या? चर फिर माघारा.
- मला पुढं जायचं आहे.
- अरे हो मोठा पुढं जाणारा. मागं फिर. पाटील बोलवताहेत तुला.
- मला काय पाटलाशी करायचं बाप्पा?
- पाटलांचा कचका माहीत नाही वाटतं. येतोस, का नेऊ खेचीत.
- खेचीत न्या.
धकांड्या मारीत स्वारीला चावडीपुढे किंवा पाराजवळ आणायचे.
पाटील – कुठून आलास रे?
डेबूजी – इकडून आलो.
पाटील – इकडून? इकडून म्हंजे कुठून?
डेबूजी – इकडून म्हंजे तिकडून.
पाटील – चाललास कुठं?
डेबूजी – पाय नेतील तिकडं.
पाटील – कोण आहेस तू?
डेबूजी – बाप्पा, मी आहे भयाणा.
पाटील – घरदार बायकापोरं काही आहेत का?
डेबूजी – आठवत नाही.
पाटील – आईबाप तरी होते का?
एक टवाळ – का आकाशातनं पडलास?
डेबूजी – हो, अगदी तसंच.
टवाळ – तरणा तगडा दिसतोस. बायको नाही का केलीस?
डेबूजी – केली होतीसे वाटतं.
पाटील – मग घराबाहेर कशाला पळालास?
डेबूजी – बायकोनं दिलं हुसकून म्हणून.
पाटील – बायकोनं हुसकलं नि तू बाहेर पडलास? शहाणाच आहेस.
डेबूजी – शहाणा नाही बाप्पा. भयाणा आहे मी भयाणा. असली कसली तरी भरमसाट उत्तरे देऊन तो आपली मनसोक्त टिंगलटवाळी निंदा करून घ्यायचा. क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादि षड्रिपूंची खरचटून झाडणी करण्यासाठी डेबूजीने साधकावस्थेच्या केलेल्या या विलक्षण तपश्चर्येला `असामान्य’ हे विशेषण सुद्धा अपुरे पडेल.
ऋणमोचनचे ऋण फेडले
सन १९०७ साली डेबूजी बिनचूक ऋणमोचनच्या यात्रेला आला. या वर्षी त्याने नामसप्ताह आणि भंडा-याची योजना जमातीपुढे मांडली. लगोलग चार पाचशे रुपये जमा झाले. पक्वान्नांची भांडी चुलीवर चढली. तिकडे ओल्या दरडीवर सुकी माती घालण्याचा डेबूजीचा कार्यक्रम चालू झाला. संध्याकाळी ५ वाजल्यावर सरळ ओळीत पद्धतशीर पंगती मांडल्या. सगळ्या स्त्री-पुरुषांना नि मुलांना हातपाय धुवून पानांवर बसवले. वाढणीसाठी स्वयंसेवकांची योजना केली. काही बायकाही तयार झाल्या. प्रत्येक पानापुढे उदबत्त्या लावल्या आणि सर्व सिद्ध झाल्यावर पुण्डलीक वरदा हाsरी विठ्ठलच्या जयघोषात भोजनाला प्रारंभ झाला. परीट जमातीचा हा शिस्तवार भंडारा पहायला गावोगावचे लोक धावून आले. पंगती चालू असताना डेबूजीने एकतारीवर सुस्वर अभंगांचे गायन करून, त्यातूनही आत्मोद्धाराचे नि समाजोन्नतीचे ज्ञान श्रोत्यांना दिले. डेबूजीच्या संघटन-चातुर्याची जो तो मनमुराद वाहवा करू लागला. मागासलेली नि अडाणी नाक्षर परीट जात. पण तिला हे नवीन शिस्तीचे नि संघटनेचे वळण डेबूजीने लावलेले पाहून, त्या जमातीत त्याचा मोठा आदर होऊ लागला. एवढा मोठा मिष्टान्नाचा भंडारा झाला. हजार बाराशे पान झाले. मोठा सोहळा झाला. डेबूजीने अभंग गाऊन पंगतीची करमणूक केली. अखेर खरकटी काढली. भांडी घासली. जागा साफ केली आणि स्वतः मात्र चटकन कोठेतरी जाऊन मिळवलेल्या शिळ्यापाक्या भाकरी चटणीवर नदीकाठी जाऊन आपले नेहमीचे जेवण केलेले पहाताच हजारो स्त्री-पुरुषांच्या डोळ्यांत कौतुकाचे, कृतज्ञतेचे आणि आदराचे अश्रुबिंदू चमकले.
Comments
Social Counter