All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    36 - ना मंत्र ना गुरूपदेश

     अध्याय 36 - ना मंत्र ना गुरूपदेश


    शिष्यांच्या कानात मंत्रोपदेश देणे, ठराविक संप्रदायाची माळ गळ्यात घालणे किंवा एकादा विशेष पेहराव वापरायला लावणे, या मामुली संताळी चाळ्यांना गाडगे बाबांनी केव्हाही थारा दिला नाही नि मुलाजाही राखला नाही. ``ज्यांना लोक-सेवेची ही कष्टाची कामगिरी आवडत असेल, त्यांनी कडकडीत निर्लोभी वृत्तीने ती करावी. परवडली नाही, संसाराचा मोह मनात डोकावू लागला रे लागला का झटदिशी हा मार्ग सोडून खुशाल प्रपंचाला लागावे.’’ हा त्यांचा इषारा वरचेवर ते अनुयायांना देत असतात. आधी प्रपंच करा नि मग परमार्थाला लागा, हे प्रत्येक नवागताला बाबा अट्टहासाने सांगतात. अविवाहिताला  सुद्धा ``लग्न करूनही बायकोसकट लोकसेवेच्या मार्गाला लागलास तरी हरकत नाही. पण दांभिक ब्रह्मचर्य नको.’’ असा खडखडीत इषारा देतात. शिष्य म्हणून मिरवणारांना अनुलक्षून कीर्तनात ते कटाक्षाने जाहीर सांगत असतात की –
    ``मला कुणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही. स्वयंप्रेरणेने प्रपंचाचा मोह टाकून जे जे कोणी निरिच्छतेने आणि निर्लोभी वृत्तीने दीनोद्धाराच्या आणि अडाणी जनतेला देवधर्म विषयाचे खरे ज्ञान देऊन त्यांना कर्तबगार बनवण्याच्या कामात तल्लीनतेने झतटत झगडत अजून माझ्या मागे टिकून राहिलेले आहेत, ते सारे माझ्या अनंत जन्माचे गुरूच आहेत.’’ परवा एका गावी कीर्तन करीत असताना आपल्या एका अनुयायाचा बाबानी गुरुबंधू म्हणून उल्लेख करताच, सभोवारचा हजारो श्रोतृगण चमकला. शिष्याला बाबा `गुरुबंधू’ म्हणतात हे काय गूढ असावे, हाच प्रत्येकाला प्रश्न पडला. खुलासा विचारला असता बाबा हासत हासत म्हणाले - ``बाप्पा, तुकारामबुवा आमचे समद्याहीचे (सगळ्यांचे) गुरू. त्याहीचे (त्यांचे) आमी सगयेच (सगळे) शिष्य न हो काय?’’ या छोट्याशा उत्तरातच बाबांच्या सांप्रदायिक निषेधाचे सारे ब्रह्माण्ड आढळते.



    कीर्तन-सप्ताह आणि भंडारे

    बाबांचा लोकसंग्रह शतरंगी आहे. त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांत ब्राह्मणांपासून तो थेट महार मांगापर्यंत सर्व जमातीचे कीर्तनकार भजनी लोकसेवक आणि त्यागी संचारी प्रचारक यांचा सरमिसळ भरणा झालेला आहे. कोण कोठचा नि कोणत्या जातीचा हा भेदच उमगायचा नाही. भेदातीत बंधुभावाचे इतके कौतुकास्पद उदाहरण उभ्या भारतखंडात एकाहि संघटनेत आढळणार नाही.
    `कीर्तनाला जा’ असा बाबांचा हुकूम सुटला आणि नवशिक्याने कुठे जाऊ या? असा सवाल टाकला म्हणजे बाबा सांगतात - ``हवा तिथे हवेसारखा जा. पाय नेतील तिकडे जावे. हरिनामाचा गजर करावा, कीर्तन करावे आणि पुढे चालते व्हावे, सारा देश आपल्याला मोकळा आहे.’’
    बाबांच्या कीर्तनाची मोहिनी महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात संचारल्यावर, जागोजाग लोक त्यांना सप्ताहाचा आग्रह करू लागले.  जा त्या गावी, लावा विणा, असा हुकूम सुटला का अनुयायांपैकी कोणीतरी तेथे जाऊन सप्ताहाचा प्रारंभ करायचा. सातव्या दिवशी फक्त कीर्तनाला बाबा हजर. गाडगेबाबांचे कीर्तन होणार ही आवाई गेली का आसपासच्या १०-१० नि १५-१५ कोसांवरून स्त्री-पुरुष-मुलांचे घोळकेच्या घोळके पायी, घोड्यांवर नि गाड्यांतून जमा व्हायचे. त्या चिमुकल्या खेड्यात किंवा तालुक्याच्या गावात एकाकी मोठे लष्कर उतरल्यासारखा गाडीतळ पडायचा. माणसांची तर दाटीवाटीची यात्राच जमायची.

    प्रसादाच्या भंडा-याची योजना
    बाबांच्या कीर्तनासाठी गावोगावचे हजारो लोक आस्थेने यायचे. मावळतीला परक्या गावी आल्यावर त्यांच्या जेवण्याखाण्याची सोय काय? कीर्तन रात्री ९च्या पुढे चालू व्हायचे नि मध्यरात्री १-२ वाजता पुरे व्हायचे. म्हणजे रात्रभर मुक्काम करावाच लागे. सुखवस्तू आपापल्यापुरते फराळाचे आणीत. पण केवळ बाबांच्या रसाळ कीर्तनाच्या रंगात रंगण्यासाठी अन्नपाण्याची पर्वा न करता आलेल्या इतर असंख्य जनांची सोय काय? त्यांनी काय उपाशी पोटी कीर्तन ऐकावे?

    थोडे तरी फार, तुका म्हणे परोपकार, या तुकोक्तीच्या संदर्भाने बाबांनी लोकमताचा कल भंडा-याकडे मोठ्या कुशलतेने वळवून, सप्ताहाच्या दिवशी भंडा-याचा महाप्रसाद करविण्याचा प्रघात सर्वत्र रूढ केला. ``गोरगरिबांसाठी थोडेबहुत अन्नदान कराल तर ठीक होईल. आपल्याला दूध द्यायची सक्ती नसेल तर ताक तरी द्यावे. तेहि नसेल तर पोटभर पाणी पाजावे `आईये बैठीये पीजे थोडा पाणी, यह दो बातोंको नलगे पैसा और आणि.’ आपल्याकडे येणा-यांचा प्रेमाने आदर करणे हा मोठा गृहस्थ-धर्म आहे.’’ अशा अर्थाचे बाबांचे उद्गार बाहेर पडताच मग काय हो! सारे गावकरी कंबर कसून भंडा-यासाठी साहित्याची भराभर जमवाजमव करायचे. ज्वारी – गव्हाच्या पिठांची पोती, साखरेच्या गोणी, गुळाच्या ढेपी, भराभर थप्प्या लागायच्या. चुली पेटायच्या. पुरुष बायका मुले कामाला लागायची. सैपाक तयार झाला का पुढचा थाट पहा कसा व्हायचा तो.
    बाबांनी नि अनुयायांनी हातात खराटा घेऊन भोजनासाठी जागा अशी स्वच्छ नि चोख झाडायची का सारे गावकरी आश्चर्याने बघतच रहायचे. ज्वारीच्या पिठाने रांगोळ्या घालायच्या पत्रावळी मांडायच्या. ``बाबा आम्ही आहोत, तुम्ही नुसते पहा.’’ असे कुणी सांगितलेले परवडायचे नाही. कामाचा झपाटा सारखा चालू. पंगतीसुद्धा नीट सरळ ओळीत रांगेने आखायच्या. वेडेवाकडे जड बोजड थातर मातर खपायचे नाही. पंगतीच्या मांडणीचा थाट पाहून शहरी इंजेनरही तोंडात बोट घातले पाहिजे आणि खेडुतांनाही शिस्तीच्या वळणाचा धडा घेता आला पाहिजे, असे धोरण. वेळ झाली का सगळे भोजनार्थी पाहुणे, जात कुळी, धर्म, स्पृश्य-अस्पृश्य कसलाही भेद न जुमानता, सरळ एकाजवळ एक एका पंगतीत बसून पुण्डलीक वरदा हारि विठ्ठल गर्जनेत जेवायचे. जेवणे आटोपल्यावर खरकटी काढायला, जागा झाडून सारवून स्वच्छ करायला, इतरांच्या बरोबरीने गाडगे बाबा सगळ्यांच्या पुढे हजर.  सहस्रभोजन आटोपताच कीर्तनासाठी रंगणाची व्यवस्थाही तेच करायचे. इकडे दिवाबत्ती लागत आहे तोच चटकन बाबा कोठेतरी निघून जायचे. एवढे प्रचंड मिष्टान्नांचे भोजन व्हायचे, पण बाबांनी आजवर चुकून कधी त्यातला एक घास तोंडात घातलेला नाही. ते जवळपासच्या कोठेतरी एकाद्या झोपडीसमोर हारळी देऊन मिळेल ती कांदा चटणी मडक्यात खाऊन, बिनचूक वेळेला कीर्तनासाठी समाराधनेच्या जागेवर हजर. मात्र असल्या मिष्टान्न समाराधनेतच जर कोणी भाकर, भाजी , झुणका, आमची आणून त्यांच्या मडक्यात दिली तर पंगतीत दाटीवाटीने बसून आनंदाने खातील. मिष्ठान्न अपंग गोरगरिबांना. आपण स्वतः इतरांना भरपूर वाढायला सांगतील. त्यांचे खरकटे काढतील. पण एक घास चुकूनही कधी चाखणार नाहीत. हा निर्धार आजपर्यंत अखंड पाळलेला आहे. या समाराधनेत अनाथ अपंगांना कपडे वाटण्याचेही कार्यक्रम नेहमी होत असतात.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES