All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    13 - लोकसेवेचा प्रारंभ

     अध्याय 13 - लोकसेवेचा प्रारंभ

     शेतीवाडी धनत्तर पिकत आहे, गुराढोरांनी गोठा गजबजलेला आहे, चंद्रभानजीचा मुलगा आता वयात येऊन तोही हाताशी काम करीत आहे, भरपूरपैसा घरात येत आहे, समाजात मान्यता वाढती आहे, असा स्थितीतही डेबुजी लोकहिताची कामे स्वयंसेवकी वृत्तीने करू लागला. नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात नादुरुस्त झाले का ते खणून कुदळून नीट करायला कुदळ पावडे घेऊन डेबुजी स्वतः काम करीत रहायचा. लोकांना प्रथम आश्चर्य वाटले. पण अखेर लाज वाटून तेही कामाला लागायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा मिटल्या तोंडी त्याने गावक-यांना शिकवला. कोठे घाण-कचरा साचला का त्याने स्वतः जाऊन तो काढावा. कोणतेही काम करताना गाजावाजा नाही, लेक्चरबाजी नाही, काही नाही. वाईट दिसेल तेथे आपणहून चांगले करावे. त्यासाठी पदरमोडही करावी. हा खाक्या. कोणाचे काही अडले नडले का स्वतः जाऊन ते सावरावे. डेबुजीच्या या वृत्तीमुळे सारे लोक त्याला हा कुणीतरी देवाचा अवतार आहे असू मानू लागले.



    डेबुजीची आत्यंतिक भूतदया

    वाटेने जाताना जरा कुठे कुणी संकटात अडचणीत पडलेले दिसले का डेबुजी धावलाच त्याच्या मदतीला. म्हाता-या माणसाला लाकडाची गाठ फुटत नसली का याने ती फोडून द्यावी. ओझ्याखाली वाकलेल्या पोरवाल्या बाईचे ओझे आपल्य डोक्यावर घेऊन घरपोच न्यावे. चिखलात गाडी रुतली का ती जाऊन बाहेर काढावी. ना गर्व ना ताठा. व-हाडात गाडीच्या बैलांना पराण्या चोटण्याचा प्रघात फार असे. डेबुजीने ते पाहिले का कळवळत त्या शेतक-याला हटकायचा, ``बाप्पा हे काय चालवलंयस? त्या मुक्या जनावराला ना बोलता येत ना रडता ना बोंबलता. तुला कुणी ही अरी भोसकली तर कसे रे वाटंल तुला? मुक्या जनावरांचा असला छळ देवाघरी पाप आहे.’’ वारंवार प्रत्येक ठिकाणी डेबुजीने अशी कानउघडणी केल्यामुळे, त्या पराणीच्या प्रघाताला आळा बसत गेला.

    बैल किंवा गाय म्हातारी झाल्यावर निरुपयोगी जनावर म्हणून खुशाल उघड्या बाजारात कसायाला विकण्याचा धंदा फार चाले. ``ज्या गोमातेने जन्मभर दूध देऊन तुमची नि तुमच्या पोराबाळांची पोटं भरली, तुमची हाडं सकस बलवान केली, शेतीला तगडे बैल दिले, शेणखत दिले, ती आता म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय? तिला कसायाला विकता आणि तिच्या हाडामासाचे टक्के घरात आणून पोटात घालता? काय तुम्ही माणसं का भुतं? तुम्हाला कुणी म्हातारपणी असंच विकलं अथवा घरातली नसती अडगळ म्हणून दिलं उकीरड्यावर टाकून, तर कसं बरं वाटंल मनाला?’’ असा उपदेश करून तो त्या गोविक्रीला आडवायचा. सामोपचाराने कुणी ऐकले नाही तर आपल्या सवंगड्याच्या मदतीने थेट बाजारात जावून सौदा मोडायचा.

    जनावरांना रोग झालाका अडाणी शेतकरी औषधोपचाराऐवजी ठराविक भगताला बोलावून देव खेळवायचे. तो भगत चिक्कार दारू ढोसून अंगारे धुपारे करीत त्या ढोराभोवती आरोळ्या मारमारून धिंगाणा घालायचा. ढोर बचावले तर भगताचा देव खरा. मेले तर आपले नशीब. `लई विलाज केला’ म्हणत हळहळणा-यांना डेबुजी धिःक्काराने म्हणायचा - ``अरे रोग म्हंजे रोग. तो हा देवघुमव्या भगत काय कपाळ बरा करणार? तो काय ढोराचा डाक्टर आहे? तालुक्यात जावं, सरकारी डाक्टरांचं औषध आणावं. तसाच बिकट प्रसंग आला तर ढोराला गाडीत घालून तिथं न्यावं. म्हणजे रीतसर विलाज होईल. या देव धुपार नि दारूच्या बाटलीने काय होणार? झालंय का कधी जगात कुणाचं बरं यानी? ढोराबरोबर तुमचंही वाटोळं होईल असल्या फंदानं.’’


    संसारातून समाजाकडे

    पहिली मुलगी अलोका नंतर २-२- वर्षांच्या अंतराने कलावती मुलगी आणि मुद्गल नावाचा एक मुलगा झाला. मुलगा थोड्याच दिवसात वारला. घरातल्या या भानगडी आई सखुबाई निपटायची. डेबुजी तिकडे ढुंकूनही पहायचा नाही. शेती नि लोकसेवा यात तो अखंड गढलेला. जसजसे दिवस जात गेले तसतसा त्याच्या आचारविचारांना एक निराळाच गंभीरपणा येत चालला. संसार नि व्यवहाराचा गाडा चालवीत असतानाच, तो एका विशेष दृष्टिकोणातून सभोवारच्या समाज-जीवनाची सूक्ष्म पाहणी करण्यात गुंग झालेला दिसे.

    संसाराचा हा मामुली गाडा हयातभर असाच हाकत राहायचे काय? जन्माला आल्यासारखे मला आणखी काही करता येण्यासारखे नाही काय? `आणखी काही’ म्हणजे तरी काय  त्याचे त्यालाही उमगे ना. माझे सर्व काही ठाकठीक चालले असले म्हणजे आजूबाजूला ही सब कुठ आल्बेल है असे थोडेच? जिकडे नजर टाकावी तिकडे दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, सावकारांच्या तिजो-या फुगवून कष्टकरी, शेतकरी स्वतः अन्नवस्त्राला महाग. अन्याय, लाचलुचपत, पैसासाठी इमान विकणारे बाया बाप्ये, टीचभर स्वार्थासाठी दुस-याचे गळे कापणारे महाजन! अन्यायाला, खोट्यानाट्याला प्रतिकार करायचीही हिंमत कोणात नाही. अनेक घाणेरड्या रूढी, देवकार्यातले अत्याचार, गांजा-दारूचा भरंसाट फैलावा, देवधर्माच्या नावावर हज्जारो पशूंची हत्या गावोगाव राजरोस चाललेली. कोणीच या पापांच्या परवडीला थोपवीत नाही. मला काही करता येईल का? एकटा तडफडणारा जीव मी! पायात संसाराची बेडी भक्कम खळाळत आहे. काहीतरी केलं पाहिजे खरं. हरकत नाही तेवढ्यासाठी जिवाची हवी ती किंमत द्यावी लागली तरी. प्राण खर्ची घालावे, उघड्या डोळ्यांनी संसाराला आग लावावी, पण समाजातली ही शेकडो पातके खरचटून नाहीशी करावी. साधेल मला हे? कोण मला मार्ग दाखवील? या नि असल्या विचारांनी डेबुजी रात्रंदिवस बहरलेला असे.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES