अध्याय 3 - सार्वजनिक भंडा-याचा श्रीगणेशा
डेबूजी मंडळाच्या भजनाचे पुढे सप्ताह होऊ लागले. सप्ताहाची समाप्ति प्रसादाने झाली पाहिजे. पोरांची डोकी ती! कित्येकांनी आईबापांजवळ मागून, कित्येकांनी गावात भिक्षा मागून, धान्य जमा केले. गुराख्यांच्या वनभोजनासाठी गोडधोड करून द्यायचा खेडेगावच्या लोकांचा प्रघात असतोच. झाले. हां हां म्हणता नदीच्या काठावर गुराख्यांनी अन्नकोट उभा केला. डेबूजी म्हणाला - ``गळेहो आपुन त साराईच जेवतो खावतो. पन जरा भवताल पाहा ना? किती तरी अंधले, लंगले, रगतपिते, भिकारी मानसं आहेत. त्याहीले बिच्या-याहीले चुकुन तरी कधी नव्हीची जेवारी बाजरीची भाकर पोटभर खायाले भेटत नाही. आज आपुन त्याहीले सगळ्याईले बलाऊन आनुन पोटभर जेव्याले घालू. अन्नदानासारखं महापुन्य नाही. ते आपले गरीब भाऊ अन् बहयनी जेवल्या म्हंजे तोच देवाले खरा नीवद होईन.’’
डेबूजीच्या भजन मंडळात एक वाबन नावाचा महार गुराखी होता. त्याने महारावाड्यातले सारे बाप्ये बाया नि मुले शेपाटून आणली. आजूबाजूचे इतर गोसावी फकीर भिकारी पण बोलावले. डेबूजीने सगळ्यांना एक पंगतीत शिस्तवार बसवून पुंडलीक वरदा हारि विठ्ठलच्या जयघोषात जेवण घातले. ते लोक जेवत असताना डेबूजीने निवडक भजने तल्लीनतेने गायली. जेवणा-या मंडळींचा आणि गुराख्यांचा तो प्रसाद सोहळा पहायला जमलेल्या दापुरीच्या गावक-यांना एक नवलच आज तेथे दिसले. नंतर गुराखी मंडळी पंगतीने बसली. डेबूजीने बाबाजी गणाजी महाराला अगदी आपल्या शेजारी बसवले. केरकचरा झाडून साफ केल्यावर हा समारंभ आटोपला. पण त्या भ्रष्टाकाराची कुरबूर डेबूजीच्या आजोळी नि गावभर काही दिवस चालूच होती. पण डेबूजीचा खुलासा खोटा पाडण्याचे धैर्य किंवा अक्कल मात्र कोणातही नसे. दापुरीला डेबूजी असे तोवर असले अन्नदानाचे उत्सव त्याने अनेकवेळा केले.
मुलाचे पाय पाळण्यात दिसले म्हणे!
गाडगे महाराज या टोपण नावाच्या असामान्य लौकिकाने वृद्ध डेबूजी गेली ४५वर वर्षे हीच भेदातीत अन्नदानाची लोकसेवा बृहन्महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात साजरी करताना पाहून, दापुरीच्या त्याच्या त्या बालवयातल्या वर्तनाचामुलाचे पाय पाळण्यात दिसले अशा ठराविक शब्दांनी गौरव करण्याचा श्रीयुती किंवा संताळी मोह पुष्कळांना होत असतो. इतकेच काय, पण भविष्यकाळी हा कोणीतरी मोठा साधू सत्पुरुष होईल, अशी पुष्कळांनी अटकळ बांधली होती, असे धडधडीत खोटे विधानही करायला कित्येक चुकत नाहीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात? कुणाला दिसतात? कोण ते पहातात? बरे, ते दिसतात तर मग त्या बालकाला त्या पायांच्या लक्षणांप्रमाणे पुढे कोणकोण काय काय कसकसले उत्तेजन देतात? प्रत्यक्ष जन्मदात्या आईबापांनाही त्या पायांच्या लक्षणांची कसली काही कल्पना नसते, अटकळ नसते, जाणीव नसते. ती लक्षणे कुणाला दिसत नाहीत आणि कुणी ती पाहतही नाहीत. आत्मविश्वासाने नि आत्मक्लेशाने एकादा माणूस मोठा कर्तबगार झाला, नामवंत झाला, म्हणजे मग त्याच्या बालपणीच्या ख-या खोट्या आठवणी उकरून काढून, भविष्याचे सिद्धांत लढवण्याची कसरत लोक करतात, एवढाच त्या पाळण्यातल्या पायांचा अर्थ आहे. स्पृश्यांस्पृश्यांच्या सहभोजनाबद्दल आणि नदीकाठच्या भजनाच्या व्यसनाबद्दल बिचा-या बाल डेबूजीला चंद्रभानजी मामाचा खावा लागलेला कणक्या चोप आज या कल्पना-पंडितांच्या हिशेबी कशाला जमा धरलेला असेल? शिवाय महार, मराठे, परीट, सुतार, लोहार, सवंगडी आपण एकत्र का बसवतो खेळतो नि दुपारच्या न्याहारीला एकत्र जेवतो, या कृत्याच्या दूरगामी परिणामांची तरी बाल डेबूजीला काही निश्चत जाणीव असणार थोडीच? आम्ही सगळे एक, यापेक्षा कसली विशेष भावना त्या वयात त्याला असणार? शक्यच नाही. हा एक सद्गुणांचा अंकुर आहे नि तो आपण वाढवला पाहिजे, अशी पुसटसुद्धा कल्पना त्याच्या विचारांना चाटून गेली नसेल. मनाला ज्यात गोडी वाटते तेवढे करावे, अशी बालमनाची ठेवणच असते. तिची बैठक सद्गुणांवर स्थिरावणे नि पुढे ती वाढीला लागणे, हा मानवी जीवनातला एक भाग्यवान अपघातच समजला पाहिजे.
एकादा मनुष्य रंकाचा राव झाला म्हणजे त्याच्या कर्तबागारीचे श्रेय आईबापाला नि आजूबाजूच्या अलबत्या गलबत्यांना मोफत वाटण्याची वाईट खोड लोकांना असते. रामदासाने म्हणजे शिवाजीला राजकारण शिकवले म्हणून तो स्वराज्य स्थापन करू शकला. या सर्वत्र रूढ केलेल्या प्रवादात या वाईट खोडीचा पाजीपणाच स्पष्ट उघड होत नाही काय? अनाथ गुराखीपणापासून लोकहितवादी गाडगे महाराज या कर्मयोगी पदवीपर्यंत सिद्ध केलेल्या डेबूजीच्या जीवनाच्या यशवंत शर्यतीचे श्रेय एकट्या गाडगेबाबांचे आहे. त्यात इतरांना वाटेकरी बनवण्याचा मोह मूर्खपणाचा आहे.

Comments
Social Counter