All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    10 धरा त्याला... काढा बाहेर

    अध्याय 10 - धरा त्याला... काढा बाहेर

    डेबुजी वट्टीच्या शेतात सावकार आज नांगर घालून कबजा घेणार, या बातमीने आसपासचा सारा शेतकरी त्या शेताच्या आजूबाजूला जमा झाला. डेबुजी मोठ्या पहाटेलाच शेतावर गेला. मागोमाग हंबीरराव, सखूबाई वगैरे मंडळी धावली. इतक्यात ८च्या सुमाराला महाशय तिडके सावकार घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले. ७-८ औत, बैल, नांग-ये, ९-१० तगडे कजाखी नोकर बरोबर होते. जुंपा रे आपले बैल, घाला शेतात नांगर आणि  तो कोण नांगरतो आहे तिथे, त्याला गचांडी मारून बाहेर काढा.  सावकाराने आरोळी दिली. आजूबाजूच्या या भानगडीकडे मुळीच लक्ष न देता, डेबुजी आपला नांगर खाली मान घालून चालवीत होता. अरे पाहता काय. घाला त्याच्या कंबरेत लाथ नि द्या फेकून हद्दीबाहेर. सावकार पुन्हा गरजला. हंबीरराव व सखुबाईने रडकुंडी येऊन डेबुजीला बाहेर काढण्याचा खूप त्रागा केला. पण हूं का चूं न करता तो नांगर चालवीतच राहिला. धरा त्याला, काढा बाहेर, डेबुजी या सावकाराच्या आरोळ्या चालल्याच होत्या. अखेर त्याने हनमंत्या महाराला ``हनमंत्या, हो पुढे. हिसकावून तो औत. मार त्या चोराला गचांडी नि काढ शेताबाहेर.’’ असा निर्वाणीचा हुकूम केला.

    जा गुमान मागं, नाहीतर -
    हनमंत्या पुढे सरसावला. डेबुजीने त्याच्या डोळ्याला डोळा भइडवला. आगीच्या ठिणग्या पडत होत्या त्या इंगळी लाल डोळ्यांतून, ``हनमंत्या’’ डेबुजी गरजला. ``तुझ्या जिवाची तुला पर्वा नसंल, पोराबाळांची आशा नसंल, तरच पाऊल टाक पुढं. मी झालोय आताजिवावर उदार. काळाची मुंडी पिरगाळून टाकीन, तुझी रे कथा काय? एक पाऊल सरकलं पुढं का मेलास समज तू. तुझ्यामागं तुझ्या पोराबाळांना देईल का रे हा जुलमी सावकार शेरभर धान्य? जा गुमान मागं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.’’ हनमंत्या कचकला नि जागच्याजागी थबकून उभा राहिला.
    सावकाराच्या संतापाचा पारा भडकला. त्याने दोन तगडे जाठ डेबुजीच्या अंगावर सोडले. दोनी बगला एकदम पकडून त्यांनी डेबुजीचा नांगर खाली पाडला. हंबीरराव सखुबाईने रड्याचा आकांत केला. डेबुजीने एका हिसड्यात एका जाठाला कोपरखळीच्या ताख्याने पचकन खाली विव्हळत बसवले आणि दुस-याच्या पोटात लाथेची ठोकर मारून जमिनीवर पालथा लोळवला. झटकन त्याने नांगराचा तुत्या (साडेतीन हात लांबीची लोखंडाची कांब) हातात घेऊन थेट सावकारावर चाल केली. आज मी मरेन किंवा तुझ्या नरडीचा घोट घेऊन. कसा घरीजिवंत जातोस ते पहातो आता मी, अशी भयंकर गर्जना करून डेबुजी धावला. सावकार भेदरला. घोड्याचा लगाम खेचून तो परतायला वळतो न वळतो तोच डेबुजीच्या तुत्याचा तडाखा तडाड बसला घोड्याच्या पुठ्ठ्यावर. घोडा उधळला. सावकाराचे पागोटे गेले गडगडत गरगरत शेताच्या मातीत. मालक महाराज जीव घेऊन पसार झालेले पाहताच, बरोबरचे सारे नांगरे गडी नि जाठ सुद्धा भेदरले. जाता की नाही इथनं सारे? जीव घेऊन एकेकाचा. सोडणार नाही. डेबुजीचा त्या वेळचा रुद्रावतार पाहून बघ्यांचीही तिरपीट उडाली. माझ्या शेतात पाऊल टाकण्यापूर्वी घरच्या बायकांची कुंकवं पुसून या मर्दांनो, ही शेवटची गर्जना ऐकताच एकजात सगळ्यांनी भराभर पोबारा केला. डेबुजीने नांगर घेतला नि जसे काही कुठे झालेच नाही असा वृत्तीने नांगरणी पुढे चालू केली.

    THOUGHTS ON LINGUISTIC STATES